Cheapest Gold In World: विक्रमी उच्चांकावरून घसरल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या किमतीत सातत्याने घट होत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोनं आणि चांदीच्या किमतीत मोठे चढ-उतार पाहायला मिळत असून, सोन्याचे दर त्याच्या अलीकडील सर्वोच्च स्तरावरून सुमारे ७.७ टक्क्यांनी घसरलेत. नफावसुली आणि विक्रीचा दबाव वाढल्यामुळे मौल्यवान धातूंच्या किमतीत ही मोठी घसरण झाली असून, सोन्याचा भाव त्याच्या आतापर्यंतच्या उच्चांकावरून १,१०० डॉलरपेक्षा जास्त कोसळला आहे. परंतु बुधवारी मात्र त्यात वाढ पाहायला मिळाली.
चांदीच्या किमतीत १४ टक्क्यांची घट
सोन्याप्रमाणेच चांदीच्या किमतीतही मोठी घसरण झाली आहे. चांदी सध्या ७२ डॉलर प्रति औंसवर विकली जात असून, तिच्या सर्वोच्च स्तरावरून सुमारे ५० डॉलरची घट झाली आहे. ही जवळपास १४ टक्क्यांची घसरण असून यामुळे सर्वसामान्य खरेदीदारांची आवड पुन्हा वाढू लागली आहे.
भारतीय बाजारातील स्थिती
जागतिक मंदीचा परिणाम भारतीय बाजारपेठेवरही स्पष्टपणे दिसून आला. २ एप्रिल २०२६ रोजी मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (MCX) सोन्याच्या वायदा कराराची किंमत साधारणपणे १,४०,९९९ रुपये होती, ज्यात ४.५७ टक्क्यांची घट नोंदवली गेली. त्याचवेळी, चांदीच्या वायदा कराराची किंमत १३ टक्क्यांनी घसरून २,३०,७३२ रुपयांवर व्यवहार करत होती. भारतात उच्च कर, आयात शुल्क आणि मजबूत मागणीमुळे जागतिक तुलनेत दर अजूनही चढेच आहेत.
जगात कुठे मिळते सर्वात स्वस्त सोनं?
जगभरात सोन्याच्या किमतीत मोठी तफावत असून अमेरिका (USA) या बाबतीत आघाडीवर आहे. अमेरिकेत २४ कॅरेट सोन्याची किंमत १५,९०५ रुपये प्रति ग्राम, २२ कॅरेट १५,०७८ रुपये आणि १८ कॅरेट १२,३१७ रुपये प्रति ग्राम आहे. ऑस्ट्रेलिया हा सोन्याच्या बाबतीत जगातील दुसरा सर्वात स्वस्त देश असून तिथे २४ कॅरेट सोने सुमारे १५,००० रुपये प्रति ग्रामनं मिळतं. आशियामध्ये सिंगापूर हा सर्वात स्वस्त बाजार असून तिथे २४ कॅरेट सोन्याचा दर १४,३०० रुपये प्रति ग्राम आहे. याशिवाय स्वित्झर्लंड, दुबई, भूतान आणि कोलंबिया यांसारख्या देशांतही भारतापेक्षा कमी किमतीत सोनं उपलब्ध आहे.
