Byju's EdTech Brand : स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी, बॉलिवूड स्टार शाहरूख खान ब्रँड ॲम्बेसेडर राहिलेल्या बायजू कंपनी सध्या संकटात सापडली आहे. एकेकाळी भारताचा सर्वात मोठा आणि २२ अब्ज डॉलरचे मूल्य असलेला एडटेक ब्रँड असलेल्या बायजू कंपनीचे संस्थापक बायजू रवींद्रन यांना अमेरिकेतील कोर्टाने झटका दिला आहे. अमेरिकेतील न्यायालयाने कंपनीविरोधात सुमारे ८,९०० कोटी रुपयेच्या कर्जावर डिफॉल्ट आदेश जारी केला आहे. या आदेशाने कंपनीच्या जागतिक विश्वासार्हतेवर थेट परिणाम केला आहे. भारतातही कंपनी आधीच कॉर्पोरेट इनसॉल्व्हन्सी रिझोल्यूशन प्रोसेस म्हणजेच दिवाळखोरी प्रक्रियेच्या गर्तेत आहे.
चुकीचे अधिग्रहण ठरले घातक
बायजू कंपनीने पैसा आणि विस्तार वेगाने वाढवण्यासाठी अनेक अधिग्रहण केले. पण याच अधिग्रहणानी कंपनीचा पाया खिळखिळ केला. कंपनीने सुमारे ७,९०० कोटी रुपयांमध्ये आकाशला विकत घेतले होते, जी भारतीय स्टार्टअप इतिहासातील सर्वात मोठी एडटेक डील होती. त्यानंतर कोडिंग शिकवणाऱ्या व्हाईट हॅट ज्युनियर या कंपनीला ३० कोटी डॉलरमध्ये विकत घेतले, पण नंतर ही डील कंपनीसाठी तोट्याचा सौदा ठरली आणि अखेरीस ती बंद करावी लागली. इतर कंपन्यांमध्ये ग्रेट लर्निंग, टॉपर, इपिक यांसारख्या कंपन्याही कोट्यवधी डॉलर्समध्ये खरेदी केल्या गेल्या.
या अधिग्रहण खर्चाचा कंपनीच्या रोख प्रवाहावर मोठा दबाव वाढला. महसूल घटला आणि गुंतवणूकदारांनी फंड थांबवण्यास सुरुवात केली, ज्यामुळे कंपनीचे संकट वाढले.
भारतातही दिवाळखोरी प्रक्रिया सुरू
कर्ज, वेतन विवाद, कर्मचाऱ्यांची कपात, पेमेंटची थकबाकी आणि गुंतवणूकदारांचे कायदेशीर खटले यामुळे बायजूची स्थिती इतकी बिघडली की, आता कंपनीविरोधात भारतात दिवाळखोरी प्रक्रिया सुरू झाली आहे.
या प्रक्रियेमुळे कंपनीचे मालमत्तांचे योग्य मूल्यांकन केले जाईल आणि दोन मार्ग उपलब्ध होतील. एकतर कंपनीची पुनर्रचना करून तिला पुन्हा उभे करणे, किंवा कंपनीला नवीन खरेदीदार मिळवून देणे.
कंपनीच्या मालमत्ता आणि तंत्रज्ञान प्लॅटफॉर्ममध्ये मनिपाल ग्रुप आणि चित्रपट निर्माते रॉनी स्क्रूवाला यांच्यासह काही जागतिक एडटेक कंपन्यांनी स्वारस्य दाखवले आहे.
बायजू रवींद्रनची भूमिका
बायजू रवींद्रन यांना भारत आणि अमेरिकेत कायदेशीर आव्हानांचा सामना करावा लागत आहे. त्यांनी यूएस कोर्टाचा आदेश चुकीचा असल्याचे सांगून त्याविरोधात अपील करण्याची घोषणा केली आहे. मात्र, कंपनीकडे आता इतका वेळ आणि आर्थिक ताकद उरली आहे का, हा मोठा प्रश्न आहे.
सध्या व्यावसायिक रेझोल्यूशन अधिकारी कंपनीच्या मालमत्तांचे मूल्यांकन करत आहे आणि खरेदीदारांशी चर्चा सुरू आहे. कंपनीचा काही नफा देणारा भाग विकला गेला, तरच हा ब्रँड काही प्रमाणात टिकून राहू शकतो.
