US Economy : जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था आणि एकमेव महासत्ता असलेला अमेरिका सध्या भीषण आर्थिक संकटाचा सामना करत आहे. इराणसोबत सुरू असलेल्या संघर्षामुळे अमेरिकन अर्थव्यवस्था अशा वळणावर उभी आहे, जिथे एकीकडे युद्धाचा अवाढव्य खर्च आणि दुसरीकडे गगनाला भिडलेले इंधन दर यामुळे 'महामंदी'चे सावट गडद झाले आहे. त्यामुळे इराणसोबतचे युद्ध फक्त अमेरिकालाच नाही तर संपूर्ण जगाला याचे परिणाम भोगावे लागणार आहेत.
डिझेलच्या दरात ४७ टक्क्यांची विक्रमी वाढ
- युद्धाच्या वणव्यामुळे अमेरिकेतील इंधन दरांनी सर्व विक्रम मोडीत काढले आहेत.
- पेट्रोल (गॅसोलीन): युद्धापूर्वी ३ डॉलर प्रति गॅलनच्या खाली असलेले दर आता ४ डॉलरच्या पार गेले आहेत.
- डिझेलचा फटका: मालवाहतुकीसाठी कणा मानल्या जाणाऱ्या डिझेलच्या किमतीत युद्ध सुरू झाल्यापासून ४७% वाढ झाली असून, दर ५.५० डॉलर प्रति गॅलनवर पोहोचले आहेत.
- यामुळे केवळ वाहतूकच नाही, तर जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीतही मोठी वाढ झाली आहे.
शेतीपासून चिप फॅक्टरींपर्यंत 'सप्लाय चेन' ठप्प
'स्ट्रेट ऑफ होर्मुज' हा जलमार्ग बंद झाल्यामुळे आधुनिक जगाची गती मंदावली आहे. याचे गंभीर परिणाम विविध क्षेत्रांत दिसत आहेत.
शेती संकट : युरिया आणि खतांच्या किमती वाढल्याने अमेरिकन शेतकऱ्यांवर सुमारे ५०,००० डॉलरचा अतिरिक्त बोजा पडला आहे.
तंत्रज्ञान क्षेत्र : कॉम्प्युटर चिप्स बनवण्यासाठी लागणाऱ्या 'हिलियम' वायूचा ३५% पुरवठा कतारमधून होतो. हा पुरवठा थांबल्याने सिलिकॉन व्हॅलीतील टेक कंपन्यांसमोर मोठे संकट उभे ठाकले आहे.
वैद्यकीय क्षेत्र : रुग्णालयातील एमआरआय उपकरणांसाठी हिलियम अनिवार्य आहे, ज्याची टंचाई आता जाणवू लागली आहे.
मंदीची चाहूल आणि 'स्टॅगफ्लेशन'ची भीती
KPMG च्या मुख्य अर्थतज्ज्ञ डायने स्वोंक यांनी इशारा दिला आहे की, जर होर्मुजची नाकेबंदी ४ ते ६ आठवडे सुरू राहिली, तर अमेरिकेत मंदी येणे अटळ आहे. अमेरिकेचा २०२६ मधील विकास दर (GDP) २.६% वरून थेट १% वर येण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. अर्थशास्त्रज्ञांना भीती आहे की अमेरिका पुन्हा एकदा १९७० च्या दशकातील 'स्टॅगफ्लेशन' सारख्या परिस्थितीत पोहोचू शकते, जिथे महागाई उच्चांकावर असते आणि विकास दर शून्यावर येतो.
वाचा - पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
युद्ध थांबले तरी लगेच दिलासा नाही?
राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लष्करी उद्दिष्टे लवकरच साध्य करण्याचा दावा केला असला तरी, तज्ज्ञांच्या मते तेल विहिरी एकदा बंद झाल्यावर त्या पुन्हा सुरू होण्यासाठी अनेक महिने लागतात. तसेच, युद्धात उद्ध्वस्त झालेल्या पायाभूत सुविधांच्या दुरुस्तीला अनेक वर्षे लागू शकतात, त्यामुळे इंधन दर पूर्वीच्या स्तरावर येण्याची शक्यता कमीच आहे.
