UClean Success Story : एका आयआयटी पदवीधराचा पगार किती असू शकतो? लाखो किंवा कोट्यवधींच्या घरात. पण बिहारच्या भागलपूरमधील अरुणाभ सिन्हा या तरुणाने ८४ लाख रुपयांची परदेशातील आलिशान नोकरी सोडून चक्क 'कपडे धुण्याचा' व्यवसाय निवडला. आज त्यांची 'यूक्लीन' ही कंपनी देशातील सर्वात मोठी ऑनलाइन लाँड्री साखळी बनली असून, तिचा वार्षिक टर्नओव्हर १६० कोटी रुपयांच्या पुढे गेला आहे.
आईने सोन्याच्या बांगड्या विकून भरली फी
अरुणाभ यांचा प्रवास अत्यंत संघर्षाचा होता. वडील शिक्षक होते, पण घरची परिस्थिती बेताचीच होती. आयआयटी मुंबईमध्ये निवड झाली खरी, पण प्रवेशासाठी पैसे नव्हते. अशा वेळी अरुणाभ यांच्या आईने आपल्या लग्नातील सोन्याच्या बांगड्या विकून मुलाच्या शिक्षणाची फी भरली. आईच्या याच त्यागाचे फळ म्हणून अरुणाभ यांनी शिक्षण पूर्ण केले आणि ८४ लाखांच्या पॅकेजवर परदेशात नोकरी मिळवली.
नोकरीत मन रमेना, घरच्यांचा विरोध पत्करून स्टार्टअप
लग्नानंतर काही काळातच अरुणाभ यांना जाणवले की नोकरीत त्यांचे मन रमत नाही. काहीतरी स्वतःचे सुरू करण्याच्या जिद्दीने त्यांनी 'यूक्लीन'ची स्थापना केली. हा त्यांचा पहिला स्टार्टअप नव्हता, याआधी त्यांना अपयशाचा सामनाही करावा लागला होता. जेव्हा त्यांनी लाँड्रीचा व्यवसाय सुरू केला, तेव्हा घरच्यांना तो आवडला नाही. "आयआयटी करून धोब्याचे काम का करायचे?" असा प्रश्न अनेकांनी विचारला, पण अरुणाभ आपल्या निर्णयावर ठाम होते.
घरबसल्या धुलाई आणि हायटेक ट्रॅकिंग
पारंपरिक धोब्याकडून कपडे धुवून घेण्याची पद्धत आता जुनी झाली आहे. अरुणाभ यांनी या व्यवसायाला डिजिटल रूप दिले. ग्राहक 'यूक्लीन'च्या ॲप, वेबसाइट किंवा व्हॉट्सॲपवरून आपली वेळ बुक करू शकतात. कंपनीचा प्रतिनिधी घरी येऊन कपडे घेऊन जातो. प्रत्येक कपड्याला 'बारकोड' लावला जातो जेणेकरून तो हरवणार नाही. अवघ्या २४ ते ४८ तासांत कपडे स्वच्छ धुवून आणि इस्त्री करून घरपोच मिळतात. ग्राहक आपल्या कपड्यांचा प्रवास 'रिअल-टाइम' ट्रॅक करू शकतात.
दरांचे गणित आणि पारदर्शकता
लाँड्री व्यवसायात अनेकदा दर स्पष्ट नसतात, पण 'यूक्लीन'ने ते सोपे केले. ग्राहकांना वॉश-अँड-आयरनसाठी प्रति किलो आणि ड्रायक्लीनसाठी प्रति नग यानुसार पारदर्शक रेट कार्ड दिले जाते. एका ठराविक किमान ऑर्डरच्या वर पिकअप आणि डिलिव्हरी पूर्णपणे मोफत दिली जाते. सर्व व्यवहार डिजिटल पद्धतीने होतात, ज्यामुळे रोख रकमेची चिंता राहत नाही.
वाचा - २१ जानेवारीपासून अमेरिकेची दारे बंद! ७५ देशांसाठी व्हिसा प्रक्रिया रोखली; भारतावर काय होणार परिणाम?
१६० कोटींची झेप
२०१६ मध्ये केवळ २० लाख रुपयांच्या गुंतवणुकीतून दिल्लीच्या वसंत कुंजमध्ये सुरू झालेला हा प्रवास आज देशभर पसरला आहे. अरुणाभ सिन्हा यांनी हे सिद्ध केले आहे की, कोणताही व्यवसाय छोटा नसतो, तर तो कशा पद्धतीने केला जातो हे महत्त्वाचे असते. आज शेकडो तरुणांना त्यांनी रोजगारही उपलब्ध करून दिला आहे.
