LPG Gas : पश्चिम आशियातील युद्धाच्या वणव्यामुळे 'स्ट्रेंट ऑफ होर्मुज' या धोकादायक जलमार्गात अडकलेल्या भारतीय जहाजांच्या सुटकेला यश येत आहे. भारताचा तिरंगा असलेले दोन मोठे एलपीजी टँकर सोमवारी सकाळी इराण आणि ओमानमधील या अरुंद समुद्रधुनीतून यशस्वीपणे बाहेर पडले आहेत. हे दोन्ही टँकर पुढील दोन दिवसांत भारताच्या किनारपट्टीवर पोहोचण्याची शक्यता असून, यामुळे देशातील गॅस पुरवठ्याला मोठा आधार मिळणार आहे.
९२ हजार टन गॅस घेऊन जहाजे भारताकडे रवाना
बंदर आणि नौवहन मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, 'पाइन गॅस' आणि 'जग वसंत' ही दोन जहाजे फारसच्या आखातातून मार्गस्थ झाली आहेत. या दोन्ही जहाजांवर एकूण ९२,६१२ टन एलपीजी आहे. या साठ्यातून देशातील सुमारे ६५.२१ लाख घरगुती गॅस सिलिंडर भरले जाऊ शकतात. विशेष म्हणजे, या दोन्ही जहाजांवर असलेला गॅस साठा हा भारताच्या एका दिवसाच्या संपूर्ण एलपीजी वापराइतका आहे.
भारतीय खलाशांची सुखरूप घरवापसी
या दोन्ही जहाजांवर भारतीय खलाशांची मोठी फौज तैनात आहे. 'पाइन गॅस'वर ३३ तर 'जग वसंत'वर २७ भारतीय नाविक आहेत. पश्चिम आशियात युद्ध पेटल्यानंतर हे खलाशी तिथे अडकून पडले होते. आता ही जहाजे २६ ते २८ मार्च दरम्यान भारतीय बंदरांवर पोहोचतील, असा अंदाज बंदर, नौवहन आणि जलमार्ग मंत्रालयाचे विशेष सचिव राजेश कुमार सिन्हा यांनी व्यक्त केला आहे.
वाचा - ऑनलाईन पेमेंट आता 'डबल' सुरक्षित! १ एप्रिलपासून केवळ OTP पुरेसा नाही; पाहा काय आहे आरबीआयचा प्लॅन?
होर्मुजमधील सद्यस्थिती काय?
इराणवर अमेरिका आणि इस्रायलने केलेल्या हल्ल्यानंतर होर्मुजची सामुद्रधुनी जवळजवळ बंद झाली होती. युद्ध सुरू झाले तेव्हा भारताचा झेंडा असलेली एकूण २८ जहाजे या धोकादायक पट्ट्यात अडकली होती. गेल्या काही दिवसांत दोन्ही बाजूंनी प्रत्येकी दोन-दोन जहाजे बाहेर काढण्यात यश आले आहे. सुरुवातीला अडकलेल्या २८ पैकी २२ जहाजे अजूनही या भागात सुरक्षित बाहेर पडण्याच्या प्रतीक्षेत आहेत.
