Air India Fuel Surcharge : एअर इंडियाच्या विमानानं प्रवास करणं आता महाग होणार आहे. १२ मार्चपासून कंपनी प्रत्येक देशांतर्गत विमान तिकिटावर ३९९ रुपयांचा फ्यूल सरचार्ज म्हणजेच इंधन अधिभार लावण्यास सुरुवात करणार आहे. एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्सप्रेस या दोन्ही विमान कंपन्यांच्या तिकिटांवर हा वाढीव दर लागू असेल. मध्य-पूर्वेतील तणावामुळे विमान इंधनाच्या (ATF) किमतीत मोठी वाढ झाली असून, त्यामुळे एअरलाईन्सच्या ऑपरेटिंग खर्चात वाढ झाली आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन एअर इंडियानं हे पाऊल उचललं आहे.
टप्प्याटप्प्यानं लागू होणार नवीन दर
हा सरचार्ज देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय मार्गांवर टप्प्याटप्प्यानं लागू केला जाईल. मध्य पूर्वेतील भू-राजकीय परिस्थितीमुळे जेट इंधनाच्या किमती वाढल्यानं हा निर्णय घेणं अनिवार्य झालं आहे, अशी माहिती समूहानं दिली आहे.
सोन्याच्या दरात तेजी, तर चांदी झाली स्वस्त; पटापट चेक करा Gold-Silver ची नवी किंमत
पहिल्या टप्प्यात ३९९ रुपयांची वाढ
पहिल्या टप्प्यात १२ मार्चपासून प्रत्येक देशांतर्गत तिकिटावर ३९९ रुपये फ्यूल सरचार्ज आकारला जाईल. विमान कंपनीनं मंगळवारी सांगितलं की, हाच सरचार्ज 'सार्क' (SAARC) देशांच्या फ्लाईट्सवर देखील लागू होईल.
आंतरराष्ट्रीय मार्गांचे गणित
विविध आंतरराष्ट्रीय मार्गांसाठी सरचार्जचे दर खालीलप्रमाणे असतील:
पश्चिम आशिया: प्रति तिकीट १० डॉलर सरचार्ज आकारला जाईल.
आफ्रिका: सरचार्ज ३० डॉलरनं वाढून आता ९० डॉलर होईल.
दक्षिण-पूर्व आशिया: सरचार्ज २० डॉलरच्या वाढीसह आता ६० डॉलर इतका होईल.
सिंगापूर: सिंगापूरला जाणाऱ्या आणि येणाऱ्या विमानांवर देखील आता सरचार्ज लागू होईल, जिथे यापूर्वी असा कोणताही अतिरिक्त चार्ज लागत नव्हता.
विमान कंपनीचं अधिकृत स्पष्टीकरण
"मध्य पूर्वेतील भू-राजकीय स्थितीमुळे जेट इंधनाच्या किमतीत झालेली प्रचंड वाढ पाहता, देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय मार्गांवर फ्यूल सरचार्ज हळूहळू वाढवणं आवश्यक झालं आहे," कंपनीनं म्हटलंय.
