Top-100 Arms Companies: भारताच्या स्वदेशी संरक्षण उत्पादन क्षमतेला जागतिक मान्यता मिळाली आहे. ‘मेक इन इंडिया’ आणि ‘आत्मनिर्भर भारत’ अभियाना अंतर्गत देशाने मोठी झेप घेतली असून, स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट (SIPRI) ने सोमवारी (1 डिसेंबर 2025) जाहीर केलेल्या अहवालात जगातील टॉप-100 शस्त्र निर्मिती कंपन्यांमध्ये भारतातील तीन कंपन्यांचा समावेश झाला आहे.
कोणत्या भारतीय कंपन्यांना जागतिक मान्यता?
हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) 44वा क्रमांक
(LCA तेजस फायटर जेटचे उत्पादन)
भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL) 58वा क्रमांक
(रडार आणि इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर सिस्टीम)
माझगाव डॉकयार्ड लिमिटेड (MDL) 91वा क्रमांक
(युद्धनौका आणि पाणबुडी निर्मिती)
ही यादी भारताच्या संरक्षण उद्योगातील वाढत्या क्षमता आणि स्वदेशीकरणाच्या प्रयत्नांचे महत्त्व अधोरेखित करते.
टॉप-5 मध्ये 4 अमेरिकन कंपन्या
SIPRI च्या अहवालानुसार जगातील सर्वोच्च पाच शस्त्र उत्पादक कंपन्यांमध्ये चार अमेरिकन कंपन्या आहेत.
लॉकहीड मार्टिन
RTX
नॉर्थरोप ग्रुमन
जनरल डायनॅमिक्स
याशिवाय, ब्रिटनची BAE सिस्टिम्स कंपनी चौथ्या स्थानावर आहे, ज्यामुळे टॉप-5 मध्ये एकमेव गैर-अमेरिकी कंपनी म्हणून तिची नोंद होते.
2024 मध्ये शस्त्रविक्रीतून विक्रमी महसूल
SIPRI चा ‘SIPRI Top 100 Arms-Producing and Military Services Companies, 2024’ रिपोर्ट दर्शवतो की, 2024 मध्ये जगातील टॉप-100 संरक्षण कंपन्यांचा एकत्रित महसूल 679 अब्ज डॉलर या विक्रमी पातळीवर पोहोचला. तर, अमेरिकेतील तीन प्रमुख कंपन्या लॉकहीड मार्टिन, नॉर्थरोप ग्रुमन आणि जनरल डायनॅमिक्स यांचा एकत्रित महसूल 2024 मध्ये 3.8% वाढून 334 अब्ज डॉलर झाला.
अमेरिका पुन्हा एकदा अव्वल
टॉप-100 यादीत अमेरिकेच्या 39 कंपन्या आहेत. यापैकी 30 कंपन्यांच्या महसुलात वाढ नोंदली गेली आहे. जगभरातील संरक्षण बाजारपेठेत अमेरिकेचे वर्चस्व कायम राहिले असले, तरी भारताचा उदय आणि टॉप-100 मध्ये तीन कंपन्यांचा समावेश ही भारतीय संरक्षण उद्योगासाठी मोठी उपलब्धी मानली जात आहे.
