Tilaknagar industries share: कोविडनंतर गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा देणारे शेअर बाजारात असे अनेक शेअर्स आहेत. असाच एक स्टॉक म्हणजे टिळकनगर इंडस्ट्रीज. मद्याच्या व्यवसायात गुंतलेल्या या कंपनीच्या शेअरची किंमत मार्च २०२० मध्ये १५ रुपये होती, जी ५ वर्षांनी ४५५ रुपयांच्या पातळीवर आहे. आज, २२ जुलै २०२५ रोजी, टिळकनगर इंडस्ट्रीजचा शेअर फोकसमध्ये आहे. याचं कारण म्हणजे कंपनी मोठ्या कंपनीच्या अधिग्रहणाच्या शर्यतीत आहे.
काय आहे प्रकरण?
सूत्रांनी CNBC-TV18 दिलेल्या माहितीनुसार, टिळकनगर इंडस्ट्रीज पेर्नोड रिकार्डचा लोकप्रिय व्हिस्की ब्रँड, इम्पीरियल ब्लू विकत घेण्यासाठी आघाडीवर आहे. या करारात इम्पीरियल ब्लूची किंमत सुमारे ₹४,००० कोटी असण्याची शक्यता आहे. या संभाव्य संपादनासाठी कर्ज आणि इक्विटीद्वारे निधी उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे. टिळकनगर इंडस्ट्रीजच्या बोर्डाची बैठक २३ जुलै रोजी होणार आहे. या बैठकीत निधी उभारणीच्या प्रस्तावावर विचार केला जाईल. तथापि, टिळकनगर इंडस्ट्रीज आणि पेर्नोड रिकार्ड यांनी या अधिग्रहणाबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.
शेअरमध्ये तेजी
या अधिग्रहणाच्या बातम्यांदरम्यान, मंगळवारी टिळकनगर इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्ये ८% वाढ झाली आणि त्यांनी ४५५ रुपयांचा टप्पा ओलांडला. व्यवहारादरम्यान शेअरची किंमत ४५८ रुपयांवर पोहोचली. हा स्टॉकचा ५२ आठवड्यांचा उच्चांक आहे. या शेअरचा ५२ आठवड्यांचा नीचांक २०५ रुपये आहे.
ब्रँडला यश
अलिकडेच, टिळकनगर इंडस्ट्रीजचा प्रमुख ब्रँड 'मॅन्शन हाऊस' ब्रँडीनं सलग दुसऱ्या वर्षी भारतातील सर्वाधिक विक्री होणारी ब्रँडी आणि जागतिक स्तरावर दुसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक विक्री होणारी ब्रँडी म्हणून आपलं स्थान कायम ठेवलं आहे. टिळकनगर इंडस्ट्रीज लिमिटेडच्या मते, २०२४ मध्ये मेन्शन हाऊसचे ७८ लाख केसेसची विक्री झाली. यासह, मेन्शन हाऊस ब्रँडी आता जागतिक स्तरावर २९ व्या क्रमांकाचा सर्वात मोठा ब्रँड आहे.
(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)