उद्योगपती नारायण मूर्ती यांनी कामाच्या तासाबद्दल एक विधान केले होते. हे विधान सातत्याने चर्चेच्या केंद्रस्थानी येत असते. वर्क लाईफ बॅलन्स म्हणजे काम आणि वैयक्तिक आयुष्य यांच्यातील समतोल साधण्याबद्दलच्या या मुद्द्यावर उद्योगपती गौतम अदानी यांनी सल्ला दिला आहे.
आयएएनएस या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत गौतम अदानींनी हे भाष्य केले.
बायको पळून जाईल, असं गौतम अदानी का म्हणाले?
गौतम अदानी वर्क-लाईफ बॅलन्सबद्दल बोलताना म्हणाले, "तुमचे वर्क-लाईफ बॅलन्स हे माझ्यावर किंवा माझे तुमच्यावर थोपवले जाऊ नये. असं समजा की, एक व्यक्ती त्याच्या कुटुंबासोबत चार तास वेळ घालवतो आणि तो आनंदी राहतो. दुसरा कुणी व्यक्ती कुटुंबासोबत घालवतो आणि त्यात आनंदी राहतो. तर हा त्याचे वर्क-लाईफ बॅलन्स आहे. असं असताना तुम्हीही आठ तास घरात राहिले तर बायको पळून जाईल", असे मिश्किल भाष्य अदानींनी केले.
गौतम अदानी म्हणाले, "वर्क-लाईफ बॅलन्स झालं, असं त्यावेळी वाटतं जेव्हा व्यक्ती त्याच्या आवडीचे काम करतो. जेव्हा व्यक्ती हे स्वीकारतो की, कधी न कधी आयुष्य संपवणार आहे, तेव्हा आयुष्य जगणं सोपं होऊन जातं."
नारायण मूर्ती काय बोलले होते?
"इन्फोसिसमध्ये मी म्हटले होते की, आपण जेव्हा जगातील कंपन्यांशी आपली तुलना करू. तेव्हा भारतीयांकडे करण्यासारखं खूप काही आपल्याला आपल्या महत्त्वकांक्षा मोठ्या ठेवाव्या लागतील. कारण ८० कोटी भारतीयांना मोफत रेशन मिळत आहे. याचा अर्थ ८० कोटी भारतीय गरीब आहेत. जर आपल्याला कष्ट करायचे नसतील, तर मग कोण करेल?", असे म्हणत नारायण मूर्ती यांनी त्यांच्या ७० तास काम करण्याच्या भूमिकेचे समर्थन केले होते.