Financial Lesson : सध्या प्रत्येकाचं आयुष्य हे EMI मय झालं आहे. स्मार्टफोनपासून गाडीपर्यंत आणि घरातील टीव्हीपासून स्कूलच्या फीपर्यंत सर्व गोष्टींचे हप्ते सुरू आहेत. अशा परिस्थितीत श्रीमंत कसं व्हायचं? असा प्रश्न अनेकांना सतावत आहेत. अगदी महिना दीड लाख रुपये कमावणारा व्यक्तीही म्हणतोय की महिनाअखेरीस पैसे पुरत नाही. तुम्ही चांगली कमाई करत असूनही महिन्याच्या शेवटपर्यंत तुमच्या हातात पैसे शिल्लक नसतात? तसे असेल तर तुम्ही एकटे नाही. 'जास्त पगार म्हणजे लगेच आर्थिक स्वातंत्र्य' असे अनेकांना वाटते, पण प्रत्यक्षात बहुतांश लोक 'पगार विरुद्ध जीवनशैली' नावाच्या एका अदृश्य आर्थिक सापळ्यात अडकतात. यावर आता सीए नितीन कौशिक यांनी काही टीप्स दिल्या आहेत.
पगार वाढतो, खर्चही वाढतो... पण ताण कायम
चार्टर्ड अकाउंटंट नितीन कौशिक यांच्या मते, ही एक अशी समस्या आहे, जिथे तुमची सॅलरी नव्हे, तर तुमच्या खर्चाच्या सवयी तुम्हाला मागे खेचत राहतात. पगार वाढल्यानंतर जीवनशैलीचा दर्जा उंचावणे ही सहज प्रवृत्ती असते आणि याच सवयीमुळे आर्थिक ताण कायम राहतो.
सीए कौशिक यांनी हा सापळा खालील उदाहरणांद्वारे स्पष्ट केला आहे.
- ६०,००० रुपये पगार? ५०,००० रुपये खर्च.
- १.०० लाख रुपये पगार? १.०० लाख रुपये खर्च.
- १.५० लाख रुपये पगार?गाडी अपग्रेड केली, EMI वाढवली, सर्वकाही अपग्रेड केले.
परिणाम? प्रत्येकाच्या पगाराची रक्कम वेगळी आहे, पण त्यांच्या खात्यातील बचत शून्य आहे आणि आर्थिक ताण एकसारखाच आहे. याचा अर्थ कोणतीही गुंतवणूक नाही, ना कोणतं आर्थिक स्वातंत्र्य.
श्रीमंत लोक अधिक श्रीमंत कसे होतात?
गरीब आणि श्रीमंत यांच्यातील फरक फक्त पगाराच्या आकड्यांमध्ये नसतो. सीए कौशिक सांगतात की, श्रीमंत लोक शांतपणे अधिक श्रीमंत होण्यामागे एक सोपा नियम आहे. ते त्यांचा पगार वाढवतात, पण जीवनशैलीचा खर्च वाढू देत नाहीत.
या सापळ्यातून बाहेर पडण्याचा सोपा उपाय
तुमचे उत्पन्न वाढवा.
तुमच्या जीवनशैलीचे खर्च वाढण्यापासून थांबवा.
या दोन्हीतील फरकाची रक्कम भविष्यासाठी गुंतवा.
सीए कौशिक यांचा मंत्र आहे: "१.५ लाख रुपये कमवा, पण ५०,००० रुपये कमावणाऱ्या व्यक्तीसारखे जगा, बाकीचे पैसे गुंतवा आणि तणावमुक्त आर्थिक स्वातंत्र्याचे स्वागत करा." दिखावा करणे सोडा आणि शांतपणे गुंतवणूक करणे सुरू करा, जेणेकरून तुम्ही तुमचे आयुष्य जगू शकाल आणि तुमचा पैसा तुमच्यासाठी काम करेल.
वेळेचा २०% 'येथे' गुंतवा
फक्त नोकरीवर अवलंबून राहून आर्थिक स्वातंत्र्य मिळवणे कठीण आहे, असा इशाराही सीए कौशिक देतात. जीवन-निर्वाह खर्च दरवर्षी ६-७% वाढत असताना, तुमचा पगार दुप्पट होण्यासाठी जवळपास सात वर्षे लागतात.
वाचा - 'हे' मेड इन इंडिया मॅसेजिंग अॅप घेणार WhatsApp ची जागा? दुर्गम भागातील लोकांना होणार फायदा?
भविष्यातील संपत्ती निर्माण करण्यासाठी उपाय
तुमच्या वेळेपैकी सुमारे २०% वेळ अशा गोष्टींमध्ये गुंतवा ज्यामुळे तुमची वाढ अनेक पटींनी वाढेल. यात साईड स्किल्स, चांगल्या गुंतवणूक योजना, पॅशन प्रोजेक्ट्स किंवा व्यवसाय कल्पनांचा समावेश असू शकतो. तुमचा पगार फक्त तुमची बिले भरतो, पण तुमची स्वप्नेच तुम्हाला खरी संपत्ती मिळवून देतील.