बाजार नियामक 'सेबी'नं (SEBI) प्रसिद्ध 'फिनफ्लुएन्सर' मोहम्मद नसीरुद्दीन अन्सारी (ज्याला सोशल मीडियावर 'Baap of Charts' या नावानं ओळखलं जातं) याच्यावर कठोर कारवाई केली आहे. १५ डिसेंबर रोजी जारी केलेल्या आदेशानुसार, सेबीनं अन्सारी याच्याशी संबंधित थकबाकी वसूल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
अंसारीकडून सुमारे ₹२१ लाख, तर त्याच्या 'गोल्डन सिंडिकेट वेंचर्स' या कंपनीकडून सुमारे ₹१७.९० कोटी वसूल केले जाणार आहेत. याव्यतिरिक्त, राहुल राव पदमाती याच्याविरोधातही ₹२.१३ लाख वसूल करण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे. सेबीनं यापूर्वी २०२३ मध्ये अंसारी आणि त्यांच्या फर्मला शेअर बाजारात ट्रेडिंग करण्यापासून प्रतिबंधित केले होते.
नेमकं प्रकरण काय?
सेबीच्या तपासणीत असं दिसून आलं होतं की, अन्सारी 'Baap of Charts' या नावाखाली गुंतवणूकदारांना 'हमी परताव्याचे' (Guaranteed Return) आमिष दाखवून त्यांची फसवणूक करत होता. तो सोशल मीडियाच्या माध्यमातून सेबीकडे नोंदणी न करताच गुंतवणूक सल्लागार म्हणून सेवा देत होता, जे नियमांचं थेट उल्लंघन आहे. नियामकानं हे देखील शोधलं की अन्सारी आणि त्याच्या टीमला सुमारे अडीच वर्षांत ₹३ कोटींचं ट्रेडिंग नुकसान झालं होतं, जे त्यानं आपल्या क्लायंट्सपासून लपवलं. याचा अर्थ ज्या व्यक्तीकडून गुंतवणूक शिकवली जात होती आणि नफ्याचा दावा केला जात होता, ती व्यक्ती स्वतः तोट्यात होती.
सेबीनं दिले निर्देश
वसुली प्रक्रियेअंतर्गत, २२ ऑगस्ट २०२५ रोजी सेबीच्या वसुली अधिकाऱ्याने बँकांना निर्देश दिले होते की, डिफॉल्टर्सच्या खात्यात असलेली रक्कम सेबीकडे हस्तांतरित करावी. यासोबतच, म्युच्युअल फंड कंपन्यांनाही आदेश देण्यात आले होते की, अन्सारी आणि इतर डिफॉल्टर्सच्या नावावर असलेल्या म्युच्युअल फंड युनिट्स 'रिडिम' करून ती रक्कम सेबीकडे पाठवावी. परंतु, सेबीचं म्हणणं आहे की बँक खात्यातून आणि गुंतवणुकीतून मिळणारी रक्कम थकबाकी भरण्यासाठी पुरेशी नाही.
याच कारणामुळे सेबीनं आता अधिक कठोर पावलं उचलत अन्सारी आणि इतर डिफॉल्टर्सना त्यांची जंगम आणि स्थावर मालमत्ता विकण्यास, हस्तांतरित करण्यास किंवा गहाण ठेवण्यास मनाई केली आहे. आदेशात स्पष्टपणे म्हटलंय की, कोणतीही व्यक्ती अशा मालमत्तेतून कोणताही फायदा घेऊ शकत नाही, कारण त्या आता जप्त मानल्या जातील.
याव्यतिरिक्त, डिफॉल्टर्सना दोन आठवड्यांच्या आत त्यांच्या सर्व मालमत्तेचा संपूर्ण तपशील आणि स्थावर मालमत्तेची मूळ कागदपत्रे सेबीकडे सुपूर्द करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, अलीकडेच सेबीनं आणखी एक 'फिनफ्लुएन्सर' अवधूत साठे यांच्या विरोधातही ₹५४६ कोटींहून अधिक रक्कम जप्त करण्याचा आदेश दिला आहे, ज्यामुळे हे स्पष्ट होते की बनावट 'फिनफ्लुएन्सर्स'वर सेबीचा फास अधिकाधिक आवळत आहे.
