Tech Mahindra : एआयमुळे साल २०२५ पासून जगभरातील आयटी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपातीचे सत्र सुरू आहे. भारतातील आघाडीच्या कंपन्या विप्रो, इन्फोसिस, टीसीएस देखील याला अपवाद राहिल्या नाहीत. अशातच गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनी 'टेक महिंद्रा' मोठ्या प्रमाणावर कर्मचारी कपात करणार असल्याच्या चर्चांनी उधाण आले होते. मात्र, सोमवारी ९ मार्च रोजी कंपनीने अधिकृत निवेदन प्रसिद्ध करून या सर्व अफवा पूर्णपणे फेटाळून लावल्या आहेत. कंपनीने स्पष्ट केले आहे की, कर्मचारी कपातीचा कोणताही प्रस्ताव सध्या विचाराधीन नाही.
शेअर बाजाराला दिले अधिकृत स्पष्टीकरण
सोशल मीडिया आणि कर्मचारी गटांमध्ये टेक महिंद्रा १५,००० ते ३०,००० कर्मचाऱ्यांची कपात करणार असल्याच्या वावड्या उठल्या होत्या. यामुळे गुंतवणूकदार आणि कर्मचाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून कंपनीने बीएसई आणि एनएसई या दोन्ही स्टॉक एक्स्चेंजेसना लेखी स्पष्टीकरण दिले आहे.
कंपनीने आपल्या निवेदनात म्हटले आहे की
"गेल्या काही तासांत आम्हाला अनेक फोन कॉल्स आले आणि सोशल मीडियावर काही पोस्ट्स निदर्शनास आल्या, ज्यामध्ये कर्मचारी संख्येत मोठ्या कपातीची अफवा पसरवली जात आहे. आम्ही स्पष्ट करू इच्छितो की असा कोणताही निर्णय किंवा प्रस्ताव कंपनीच्या विचाराधीन नाही. आम्ही या अफवांचे स्पष्टपणे खंडन करतो."
वाचा - चीनमध्ये महागाईचा भडका! तीन वर्षांतील उच्चांकी स्तर गाठला; भारतासह जगाची चिंता वाढली
सेबीच्या नियमांचे पालन आणि पारदर्शकता
टेक महिंद्राने पुनरुच्चार केला आहे की, कंपनी मार्केट रेग्युलेटर सेबीच्या लिस्टिंग नियमांचे आणि सर्व डिस्क्लोजर नियमांचे काटेकोरपणे पालन करत आहे. भविष्यातही कोणतीही महत्त्वाची माहिती अधिकृत माध्यमांतूनच दिली जाईल, असे आश्वासन कंपनीने दिले आहे. आयटी क्षेत्रात सध्या जागतिक पातळीवर अनिश्चितता असताना अशा अफवा पसरल्याने भागधारक आणि गुंतवणूकदारांमध्ये भीती वाढली होती. मात्र, या स्पष्टीकरणामुळे आता बाजाराला दिलासा मिळाला आहे.
