TCS Salary Hike : आयटी क्षेत्रातील आघाडीची कंपनी टीसीएने या वर्षी १२,००० कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची घोषणा केल्यानंतर टीकेची झोड उठली होती. मात्र, आता त्यांनी कर्मचाऱ्यांना दिलासा देणारा मोठा निर्णय घेतला आहे. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसने बुधवारी आपल्या कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी घोषणा केली. कंपनीने कनिष्ठ आणि मध्यम स्तरावरील सुमारे ८० टक्के कर्मचाऱ्यांचे वेतन वाढवणार असल्याची माहिती दिली आहे. ही पगारवाढ १ सप्टेंबर २०२५ पासून लागू होईल, असे टीसीएसचे मुख्य मानव संसाधन अधिकारी मिलिंद लक्कड आणि CHRO-नियुक्त के. सुदीप यांनी कर्मचाऱ्यांना पाठवलेल्या ईमेलमध्ये सांगितले आहे. या घोषणेने ८०% कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाची लाट असली तरी, उर्वरित २०% कर्मचाऱ्यांमध्ये मात्र नाराजी पसरली आहे.
१२,००० हून अधिक कर्मचाऱ्यांची कपात
कर्मचाऱ्यांना बक्षीस देण्याचा आणि टिकवून ठेवण्याचा टीसीएसचा हा निर्णय अशा वेळी आला आहे, जेव्हा कंपनी आपल्या एकूण कर्मचाऱ्यांपैकी १२,००० हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार आहे. टीसीएसने नुकतीच त्यांच्या जागतिक कर्मचाऱ्यांपैकी सुमारे २ टक्के, म्हणजेच १२,२६१ कर्मचाऱ्यांना कमी करण्याची घोषणा केली होती. या कपातीमध्ये बहुतेक मध्यम आणि वरिष्ठ स्तरावरील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
टीसीएसने या कपातीबाबत स्पष्टीकरण दिले आहे की, ही कारवाई कंपनीच्या 'भविष्यासाठी सज्ज संघटना' बनण्याच्या धोरणाचा एक भाग आहे. कंपनी तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) वापर, बाजार विस्तार आणि कर्मचाऱ्यांची पुनर्रचना या क्षेत्रांमध्ये गुंतवणूक वाढवत आहे.
कर्मचाऱ्यांची सध्याची संख्या आणि विरोधाचे सूर
जून २०२५ च्या अखेरीस, टीसीएसमध्ये ६,१३,०६९ कर्मचारी होते. चालू आर्थिक वर्षाच्या एप्रिल-जून तिमाहीत कंपनीने ५,००० नवीन कर्मचाऱ्यांची भरती केली होती. कर्मचाऱ्यांच्या कपातीबाबत केंद्र सरकार आणि कर्नाटक सरकार दोघांनाही माहिती देण्यात आली आहे. कर्नाटक राज्य आयटी/आयटीईएस कर्मचारी संघटनेने या मोठ्या कपातीवर तीव्र आक्षेप घेतला आहे. त्यांनी औद्योगिक वाद कायदा, १९४७ च्या तरतुदींचे उल्लंघन केल्याबद्दल टीसीएस व्यवस्थापनावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करत अतिरिक्त कामगार आयुक्त जी. मंजुनाथ यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे.