Tata Investment Corporation : सोमवारी टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशनने एक महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे, ज्यामुळे त्यांचे शेअर्स खरेदी करणाऱ्यांसाठी एक मोठी संधी निर्माण झाली आहे. कंपनीने आपल्या पहिल्या तिमाहीच्या निकालांसोबतच १:१० प्रमाणात स्टॉक स्प्लिट जाहीर केला आहे. याचा अर्थ, ज्या गुंतवणूकदारांकडे १० रुपये दर्शनी मूल्य असलेला एक शेअर आहे, त्यांना तो १ रुपये दर्शनी मूल्य असलेल्या दहा शेअर्समध्ये विभागून मिळेल.
स्टॉक स्प्लिटचा उद्देश काय?
स्टॉक स्प्लिट जाहीर करण्यामागे कंपनीचा मुख्य उद्देश शेअरची तरलता वाढवणे आणि किरकोळ गुंतवणूकदारांसाठी शेअर्स स्वस्त करणे आहे. जेव्हा शेअरची किंमत खूप जास्त होते, तेव्हा अनेक लहान गुंतवणूकदारांना तो खरेदी करणे कठीण जाते. स्टॉक स्प्लिटमुळे शेअरची किंमत कमी होते, पण तुमच्याकडील एकूण शेअर्सची संख्या वाढते, ज्यामुळे एकूण मूल्य तेवढेच राहते. कंपनीने अजून स्टॉक स्प्लिटसाठीची रेकॉर्ड डेट जाहीर केलेली नाही.
पहिल्या तिमाहीचे निकाल दमदार
स्टॉक स्प्लिटसोबतच कंपनीने एप्रिल-जून तिमाहीचे चांगले आर्थिक निकालही जाहीर केले आहेत.
कंपनीचा नफा ११.६ टक्क्यांनी वाढून १४६.३ कोटी रुपये झाला आहे, जो गेल्या वर्षी याच तिमाहीत १३१.०७ रुपये कोटी होता.
या तिमाहीत कंपनीचे एकूण उत्पन्नही थोडे वाढले असून, ते १४२.४६ कोटींवरून १४५.४६ कोटी रुपये झाले आहे.
शेअरमध्ये वाढ
उत्कृष्ट तिमाही निकाल आणि स्टॉक स्प्लिटच्या घोषणेमुळे टाटा इन्व्हेस्टमेंटचा शेअर सोमवारी जोरदार वाढला. दुपारी २.३० वाजता, कंपनीचा शेअर २.८३ टक्क्यांनी वाढून ६,९७०.३५ रुपयांवर व्यवहार करत होता. आतापर्यंतच्या व्यवहारात तो ७,१५६.५५ रुपयांच्या उच्चांकावर गेला होता.
वाचा - 'किमान माणसासारखी तरी वागणूक...' IT अभियंता तरुणीची पोस्ट व्हायरल, म्हणाले मॅनेजरसमोरच मी...
या निर्णयामुळे टाटा इन्व्हेस्टमेंटच्या शेअरमध्ये गुंतवणूक करण्यास इच्छुक असलेल्या अनेक किरकोळ गुंतवणूकदारांसाठी एक चांगली संधी निर्माण झाली आहे.