Completely Cashless : युरोपातील देश असलेल्या स्वीडनने जगातील पहिला 'पूर्णपणे कॅशलेस' देश बनण्याचा मान मिळवला आहे. या देशात लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वच नागरिक आता ॲप्स आणि डिजिटल माध्यमांद्वारे पैसे देतात. विशेष म्हणजे, हा तोच देश आहे ज्याने युरोपात पहिल्यांदा कागदी नोटा जारी केल्या होत्या. मात्र, आता स्वीडनमध्ये १% पेक्षाही कमी व्यवहार रोख रकमेत होतात. बाकी सर्वकाही मोबाइल ॲप्स, डेबिट कार्ड किंवा कॉन्टॅक्टलेस पेमेंटद्वारे केले जाते.
स्वीडन कॅशलेस कसा झाला?
२०१० मध्ये स्वीडनमधील सुमारे ४०% पेमेंट रोखीत होत असत. मात्र, २०२३ पर्यंत हा आकडा १% पेक्षाही कमी झाला. एका दशकात या देशाने जवळजवळ संपूर्ण डिजिटल पेमेंट प्रणाली स्वीकारली आहे. २०१२ मध्ये स्वीडनमधील प्रमुख बँकांनी एकत्र येऊन 'स्विश' नावाचे मोबाइल पेमेंट ॲप लॉन्च केले. आज याचे ८ कोटींहून अधिक युजर्स आहेत, जे देशाच्या एकूण लोकसंख्येच्या ७५% पेक्षा जास्त आहेत. लोक या ॲपचा वापर बिल भरण्यापासून ते रस्त्यावरील विक्रेत्यांना पेमेंट करण्यापर्यंत करतात.
बँकिंग आणि व्यवहारात मोठे बदल
स्वीडनच्या या बदलामुळे त्यांच्या बँकिंग प्रणालीतही मोठी क्रांती झाली आहे. ५०% हून अधिक बँक शाखा आता रोख व्यवहार करत नाहीत. एटीएमची संख्या झपाट्याने कमी होत आहे. दुकानांवर "No Cash Accepted" (रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही) असे बोर्ड दिसणे सामान्य झाले आहे.
वृद्धांनाही डिजिटलची सवय
स्वीडनमध्ये डिजिटल सुविधा प्रत्येक वयोगटातील लोकांपर्यंत पोहोचल्या आहेत. सरकारने डिजिटल साक्षरता कार्यक्रम चालवून वृद्धांनाही या बदलाशी जोडले आहे. ६५ वर्षांवरील ९५% लोक देखील आता सहजपणे डेबिट कार्डचा वापर करतात.
वाचा - 'या' सरकारी App द्वारे ऑनलाईन रेशन कार्डसाठी अर्ज करता येणार! 'या' राज्यांमध्ये सुविधा सुरू
भविष्यातील तयारी
स्वीडनची मध्यवर्ती बँक, रिक्सबँक, आता भविष्यातील अर्थव्यवस्थेची सुरक्षा आणि आधुनिकीकरण करण्यासाठी 'e-Krona' नावाच्या डिजिटल चलनात काम करत आहे. स्वीडनच्या या पावलामुळे नॉर्वे, फिनलंड आणि दक्षिण कोरियासारखे देशही लवकरच कॅशलेस होण्याच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहेत.
