House Help Buys Flat : शहरात स्वतःचे घर खरेदी करण्याचे स्वप्न दिवसेंदिवस सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जात आहे. लाखभर रुपये पगार असलेल्या व्यक्तीलाही ५० ते ६० लाख रुपयांचे कर्ज फेडण्यास नाकीनऊ येतात. अशा परिस्थितीत तुम्हाला जर सांगितलं की दुसऱ्यांच्या घरात धुणीभांडी करणाऱ्या महिलेने ६० लाखांचा फ्लॅट घेतला? तर तुमचा विश्वास बसले का? पण, खरा धक्का तर तुम्हाला अजून पचवायचा आहे, संबंधित महिलेने ६० लाखांचा फ्लॅट घेण्यासाठी केवळ १० लाख रुपयांचे कर्ज काढलं आहे. थांबा.. गडबड करू नका. ही खरी कहाणी समजून घेऊ.
सुरतमध्ये घरगुती काम करणाऱ्या एका कामवालीबाईने हा पराक्रम केला आहे. या महिलेने शहरात तब्बल ६० लाख रुपये किमतीचा फ्लॅट खरेदी केला आहे. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे, तिने त्यासाठी केवळ १० लाखांचे कर्ज घेतले आहे. उर्वरित रक्कम तिने स्वतःच्या बचतीतून भरली आहे. ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होताच तिच्या आर्थिक नियोजनाचे कौतुक होत आहे.
६० लाखाच्या फ्लॅटसाठी कर्ज फक्त १० लाख रुपये
नलिनी उणागर नावाच्या महिलेने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर ही माहिती सर्वात आधी शेअर केली. त्यांनी सांगितले की, त्यांच्या घरी काम करणाऱ्या मोलकरणीने जेव्हा ही बातमी दिली, तेव्हा त्या काही क्षण स्तब्ध झाल्या होत्या. फ्लॅटची किंमत ६० लाख रुपये असून, महिलेने केवळ १० लाखांचे कर्ज घेतले आहे. याचा अर्थ तिने ५० लाख रुपये स्वतःच्या बचतीतून आणि रोख रकमेतून जमा केले. इतकेच नव्हे, तर नवीन घरात तिने ४ लाखांचे महागडे फर्निचरही लावले. नलिनी यांनी 'मी खरंच थक्क झाले,' अशी भावना व्यक्त केली.
कमाईचे गुपित : ही पहिली प्रॉपर्टी नाही!
नलिनी यांनी जेव्हा त्या मोलकरणीला हे कसे शक्य झाले, असे विचारले, तेव्हा तिने दिलेले उत्तर अधिकच आश्चर्यकारक होते. तिने खरेदी केलेली ही पहिली मालमत्ता नव्हती. या महिलेकडे यापूर्वीच गुजरातच्या वेलंजा गावात एक दोन मजली घर आणि एक दुकान आहे. विशेष म्हणजे, या दोन्ही मालमत्ता तिने भाड्याने दिल्या असून, त्यातून तिला नियमित उत्पन्न मिळत आहे. या पोस्टच्या खाली महिलेचे कौतुक करणाऱ्यांचा पूर आला आहे.
My house help came in today looking really happy. She told me she just bought a 3BHK flat in Surat worth ₹60 lakhs, spent ₹4 lakh on furniture and took only a ₹10 lakh loan. I was honestly shocked.
— Nalini Unagar (@NalinisKitchen) October 7, 2025
When I asked more, she mentioned that she already owns a two-floor house and a… pic.twitter.com/OWAPW99F46
नलिनी उणागर यांची पोस्ट तुफान व्हायरल झाली आहे. एका यूजरने नलिनी यांना विचारले की, 'तुम्ही थक्क का झालात? कोणीतरी प्रगती करत असेल तर तुम्हाला आनंद व्हायला हवा.'
त्यावर उत्तर देताना नलिनी यांनी अत्यंत महत्त्वाचा मुद्दा मांडला : "अर्थात, मला तिच्या प्रगतीचा आनंद आहेच. पण, एक समाज म्हणून आपण अशी मानसिकता बनवली आहे की, अशा प्रकारची कामे करणारे लोक गरीब असतात. प्रत्यक्षात, ते पैशाच्या बाबतीत आपल्यापेक्षा अधिक हुशार असतात. आपण कॅफे, महागडे फोन आणि प्रवासावर खर्च करतो, तर ही लोक समजूतदारपणे बचत आणि व्यवस्थापन करतात." या उदाहरणाने मध्यमवर्गीयांच्या खर्च करण्याच्या सवयीवर आणि बचत करण्याच्या धोरणावर मोठा प्रकाश टाकला आहे.