Success Story: भारतातील सर्वाधिक फॉलो केल्या जाणाऱ्या फूड क्रिएटर्सपैकी एक असलेल्या नताशा गांधी यांचा जन्म आणि बालपण मुंबईतील मुलुंड येथे गेलं. ३२ वर्षांच्या नताशाला लहानपणापासूनच कुकिंग शोज पाहण्याची आणि रेसिपी लिहून ठेवण्याची आवड होती. मात्र, तिच्या करिअरची सुरुवात कुकिंगपासून नाही तर चार्डर्ड अकाउंटन्सीच्या (CA) अभ्यासापासून झाली होती. रात्रभर सीएचा अभ्यास करताना स्वतःला उत्साही ठेवण्यासाठी ती नवनवीन पदार्थ बनवून प्रयोग करायची. २०१७-१८ मध्ये त्यांनी एका फिनटेक स्टार्टअपमध्ये फ्रॉड इन्व्हेस्टिगेटर म्हणून नोकरीही केली, पण तिचं मन मसाल्यांच्या जगातच रमत होतं.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
'हाउस ऑफ मिलेट्स'ची सुरुवात
नताशानं सीएची पाच वेळा परीक्षा दिली होती. निकालाची प्रतीक्षा असताना २०१८ मध्ये तिनं स्वतःच्या बचतीतून आणि वडिलांच्या मदतीनं बेकिंगचं साहित्य विकत घेतलं. तिचे वडील गोड पदार्थांचे शौकीन होते, पण त्यांना बॉर्डरलाइन डायबेटिस झाल्यामुळे तिनं मिलेट्स आणि पर्यायी गोडव्याचा वापर करून पदार्थ बनवण्यास सुरुवात केली. सहा महिन्यांच्या मेहनतीनंतर त्यांनी बदाम-स्ट्रॉबेरी टी केकची परफेक्ट रेसिपी शोधली आणि नोव्हेंबर २०१८ मध्ये 'हाउस ऑफ मिलेट्स' नावाचं इंस्टाग्राम पेज सुरू केलं. या माध्यमातून तिनं ग्लुटेन-फ्री, वेगन आणि तृणधान्यावर आधारित पदार्थांवर लक्ष केंद्रित केलं.
परीक्षेतील अपयश आणि पालकांचा पाठिंबा
१५ जानेवारी २०१९ रोजी सीए परीक्षेचा निकाल लागला आणि त्यात तिला अपयश आलं. मात्र, अशा कठीण प्रसंगी तिच्या पालकांनी तिला मोलाची साथ दिली. 'किमान तुझा केकचा व्यवसाय तरी चांगला सुरू आहे,' असं म्हणत त्यांनी नताशाचे मनोबल वाढवलं. या प्रेरणेतून तिनं आपला व्यवसाय अधिक विस्तारला. तिनं फूडहॉल कुकरी स्टुडिओमध्ये सोशल मीडिया सांभाळताना व्यावसायिक शेफकडून अनेक बारकावे शिकून घेतले.
मास्टरशेफ इंडियामुळे मिळालेली नवी ओळख
नताशाच्या आयुष्याला खरी कलाटणी तेव्हा मिळाली जेव्हा तिल 'मास्टरशेफ इंडिया'च्या ऑडिशनसाठी बोलावणं आलं. तिच्या 'मिलेट पास्ता विथ मखनी सॉस' या डिशनं त्यांना स्पर्धेचं पहिलं एप्रन मिळवून दिलं. आपल्या अनोख्या पाककृतींच्या जोरावर ती टॉप ५ स्पर्धकांमध्ये पोहोचली. शो संपल्यानंतर तिचे फॉलोअर्स २ हजारांवरून थेट ६० हजारांवर गेले. कोविड काळात तिनं आपल्या बहिणीच्या मदतीनं घराघरात पोहोचणाऱ्या रेसिपीजचे व्हिडिओ बनवले, ज्यांना आज लाखो व्ह्यूज मिळतात.
नताशानं केवळ पाककृतीच बनवल्या नाहीत, तर 'बिर्याणी' आणि 'पास्ता' यांसारख्या पदार्थांच्या भारतीय प्रादेशिक पदार्थांवर संशोधन केलं. तिचे पती विनायक ग्रोव्हर (फूड फोटोग्राफर) यांच्या साथीनं तिनं भारतातील ५० प्रकारच्या बिर्याणींची यादी तयार केली आणि त्यावर काम केलं. यात केरळच्या सिरियन कॅथोलिक्सची अटेराची बिर्याणी आणि विविध प्रादेशिक पास्ता प्रकारांचा समावेश होता. आज नताशाचा उद्देश केवळ स्वयंपाक करणं नसून भारतीय प्रादेशिक खाद्यसंस्कृती साजरी करणं आणि सकस आहार सर्वांपर्यंत पोहोचवणं हा आहे.
जागतिक स्तरावर उमटवलेला ठसा
एकेकाळी सीए परीक्षेत अपयश मिळाल्यानं उदास झालेली मुलगी आज 'फोर्ब्स टॉप १०० डिजिटल स्टार्स'मध्ये सामील आहे. हाऊस ऑफ मिलेट्स आता एक डिजिटल-फर्स्ट ब्रँड बनला असून नताशा या जॉफ फूड्सच्या डिजिटल ॲम्बेसेडर आहे. नताशा गांधी आज केवळ एक यशस्वी व्यावसायिक नसून लाखो लोकांसाठी स्वयंपाकघरातील आत्मविश्वासाचे प्रतीक बनल्या आहेत.
