Satish Sanpal Success Story: सतीश सनपाल यांची यशोगाथा एखाद्या सुपरहिट चित्रपटाच्या पटकथेपेक्षा कमी नाही. मध्य प्रदेशातील जबलपूरच्या गल्ल्यांमधून बाहेर पडून जगातील सर्वात उंच इमारत असलेल्या 'बुर्ज खलिफा'मध्ये राहण्यापर्यंतचा त्यांचा हा प्रवास थक्क करणारा आहे. केवळ ८ वी पर्यंत शिक्षण घेतलेल्या सतीश यांनी वयाच्या १५ व्या वर्षी आईकडून मिळालेल्या ५० हजार रुपयांतून किराणा दुकान सुरू केलं होतं. मात्र, इतकी गुंतवणूक करूनही हे दुकान दोन वर्षांच्या आतच बंद पडलं. या सुरुवातीच्या अपयशाने खचून न जाता, वयाच्या २० व्या वर्षी ते मर्यादित संसाधनांसह नशिब आजमावण्यासाठी दुबईला गेले.
२०१८ मध्ये 'ANAX होल्डिंग्स'ची पायाभरणी
दुबईमध्ये पोहोचल्यानंतर सतीश यांनी आपली ओळख निर्माण करण्यासाठी प्रचंड कष्ट घेतले. सुरुवातीला त्यांनी ग्राहकांना शेअर बाजारातील ब्रोकर्सशी जोडण्याचं काम केलं, ज्यातून त्यांना स्थानिक बाजारपेठेची सखोल समज मिळाली. त्यानंतर त्यांनी हळूहळू इतर व्यवसायांत पाऊल ठेवले. २०१८ मध्ये त्यांनी 'ANAX होल्डिंग्स'ची स्थापना केली, जी आज एक महाकाय बिझनेस ग्रुप बनली आहे. अहवालानुसार, आज सतीश यांची एकूण संपत्ती सुमारे ८,००० कोटी रुपये असून ते बुर्ज खलिफामध्ये राहण्यासोबतच दुबई हिल्समध्ये कोट्यवधींच्या बंगल्याचे मालक आहेत.
शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; सेन्सेक्स १५० अंकांनी घसरला, IT, PSU Bank मध्ये तेजी
मुलीला 'रोल्स रॉयस' तर स्वतःला ३५ कोटींची 'बुगाटी' भेट
सतीश सनपाल यावर्षी जूनमध्ये तेव्हा चर्चेत आले, जेव्हा त्यांनी फादर्स डे निमित्त आपल्या अवघ्या एक वर्षाच्या मुलीला, इसाबेलाला चक्क 'रोल्स रॉयस' कार भेट दिली. ही कार खास इंग्लंडमध्ये इसाबेलासाठी तयार करून यूएईमध्ये आणण्यात आली होती. यापूर्वी फेब्रुवारीमध्ये त्यांनी मुलीचा पहिला वाढदिवस मोठ्या थाटामाटात साजरा केला होता, ज्यामध्ये तमन्ना भाटिया आणि नोरा फतेही यांसारख्या दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली होती. सतीश यांना महागड्या गाड्यांची प्रचंड आवड असून, त्यांनी स्वतःच्या वाढदिवशी स्वतःला ३५ कोटी रुपयांची 'बुगाटी चिरॉन' (Bugatti Chiron) कार भेट म्हणून दिली आहे.
विस्तारलेलं व्यावसायिक साम्राज्य
ANAX होल्डिंग ही एक मोठी इन्व्हेस्टमेंट कंपनी असून तिचे एकूण मूल्य सुमारे ३ अब्ज डॉलर्स आहे. या ग्रुपमध्ये रिअल इस्टेट क्षेत्रातील 'ANAX डेव्हलपमेंट्स' आणि प्रिमियम रिसॉर्ट व रेस्टॉरंट क्षेत्रातील 'ANAX हॉस्पिटॅलिटी' सारख्या कंपन्यांचा समावेश आहे. दुबईतील रिअल इस्टेट व्यवसायातील त्यांच्या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल २०२३ मध्ये त्यांना 'गोल्डन एक्सलन्स अवॉर्ड'नं सन्मानित करण्यात आलं होतं. सतीश सनपाल यांचा हा प्रवास शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या उद्योजकांसाठी एक मोठी प्रेरणा ठरत आहे.
