Strait of Hormuz : इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्धामुळे जागतिक ऊर्जा बाजारपेठ एका अभूतपूर्व संकटाच्या उंबरठ्यावर उभी आहे. जगातील दिग्गज तेल आणि गॅस कंपन्यांच्या प्रमुखांनी इशारा दिला आहे की, सध्याची परिस्थिती ही केवळ किमतींमधील वाढ नसून प्रत्यक्ष 'पुरवठा साखळी' कोलमडण्याचे संकेत आहेत. ह्युस्टन येथील 'सेरावीक' परिषदेत बोलताना तज्ज्ञांनी स्पष्ट केले की, जर हे युद्ध असेच सुरू राहिले, तर आशिया आणि युरोपला भीषण तेल टंचाईचा सामना करावा लागेल.
८० ते १०० लाख बॅरल तेल गायब!
जागतिक तेल पुरवठ्यातील महत्त्वाचा दुवा असलेल्या 'हॉर्मुझची सामुद्रधुनी' बंद झाल्याने संकट गहिरे झाले आहे. कोनोकोफिलिप्सचे सीईओ रायन लायन्स यांच्या मते, बाजारातून दररोज ८० ते १०० लाख बॅरल कच्चे तेल आणि जगातील २०% एलएनजी पुरवठा अचानक बंद झाला आहे. ही तूट भरून काढणे सध्या अशक्य आहे. कुवेत पेट्रोलियम कॉर्पोरेशनचे सीईओ शेख नवाफ अल-सबाह यांनी या परिस्थितीला पश्चिम आशियातील उत्पादकांविरुद्धची 'आर्थिक नाकेबंदी' असे संबोधले आहे. याचा 'डोमिनो इफेक्ट' संपूर्ण जागतिक अर्थव्यवस्थेवर होईल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे.
१९७३ नंतरचा सर्वात भीषण 'ऑईल शॉक'
स्वतंत्र विश्लेषक पॉल सँकी यांनी या संकटाची तुलना १९७३ च्या ऐतिहासिक 'अरब ऑईल एम्बार्गो'शी केली आहे. हॉर्मुझची सामुद्रधुनी अशा प्रकारे बंद होणे हे जागतिक इतिहासात पहिल्यांदाच घडत असून, हे ५ दशकांतील सर्वात गंभीर इंधन संकट असल्याचे त्यांनी सांगितले. अमेरिकन क्रूड ४९ टक्क्यांनी वधारून ९९.६४ डॉलर, तर ब्रेंट क्रूड ५५ टक्क्यांच्या वाढीसह ११२.५७ डॉलर प्रति बॅरलवर पोहोचले आहे.
वाचा - वेदांताचा 'पंचरत्न' प्लॅन! अनिल अग्रवाल यांच्या मेगा डिमर्जरला वेग, गुंतवणूकदारांची चांदी होणार?
पायाभूत सुविधा आणि कर्मचाऱ्यांची सुरक्षा धोक्यात
हे संकट केवळ किमतींपुरते मर्यादित राहिलेले नाही. कोनोकोफिलिप्सने कतारमधील आपल्या मालमत्तेच्या संरक्षेसाठी अमेरिकन सरकारकडे लष्करी मदतीची मागणी केली आहे. ड्रोन हल्ल्यांमुळे कंपनीला कतारमधील आपला 'एलएनजी हब' बंद करावा लागला असून, अत्यावश्यक नसलेल्या कर्मचाऱ्यांना तेथून हलवण्यात आले आहे. अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राइट यांनी ही परिस्थिती 'अल्पकालीन' असल्याचे म्हटले असले, तरी उद्योगातील तज्ज्ञांच्या मते युद्ध संपल्यानंतरही रिक्त झालेले साठे भरण्यासाठी आणि उत्पादन पूर्ववत करण्यासाठी मोठा काळ लागेल, ज्यामुळे किमती दीर्घकाळ चड्या राहतील.
