Stock Market Today: आजचा दिवस शेअर बाजारासाठी खूप महत्त्वाचा असणार आहे. आज सोमवार (२१ जुलै) रोजी कामकाजाची सुरुवात थोड्या वाढीसह झाली. पण बाजार पुन्हा एकदा फ्लॅट ट्रेडिंग असल्याचं दिसून आलं. सेन्सेक्स ३० अंकांच्या वाढीसह व्यवहार करत होता. तिथेच. निफ्टी २५,००० च्या खाली व्यवहार करत होता. बँक निफ्टी २३५ अंकांनी वधारला. सेन्सेक्स १६१ अंकांनी वाढून ८१,९१८ वर उघडला. निफ्टी ३१ अंकांनी वाढून २४,९९९ वर उघडला. बँक निफ्टी २७५ अंकांनी वाढून ५६,५५८ वर उघडला. चलन बाजारात, रुपया ७ पैशांनी घसरुन होऊन ८६.२१/ डॉलर्सवर उघडला.
अमेरिका आणि भारत यांच्यातील व्यापार कराराची चर्चा, धातूंच्या किमतीत वाढ, मोठे बँकिंग आणि कॉर्पोरेट निकाल, तसंच परदेशी गुंतवणूकदारांकडून विक्री - हे सर्व घटक बाजारातील हालचाल निश्चित करतील. संसदेच्या अधिवेशनाची सुरुवात आणि आयपीओ लिस्टिंगवर देखील गुंतवणूकदारांची नजर असेल.
यामध्ये तेजी/घसरण
एनएसई निफ्टीमध्ये एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, हिंदाल्को, टाटा स्टील आणि अल्ट्राटेक सिमेंट हे शेअर्स वधारले, तर रिलायन्स इंडस्ट्रीज, इंडसइंड बँक, अॅक्सिस बँक, टायटन कंपनी आणि अदानी पोर्ट्सचे शेअर्स घसरले. बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांक किरकोळ घसरणीसह व्यवहार करत होते.
शुक्रवारी सलग पाचव्या दिवशी नॅस्डॅक एका नवीन उच्चांकावर बंद झाला, परंतु डाऊ जोन्स १४२ अंकांनी घसरला. अमेरिकेनं युरोपियन युनियनवर १५-२०% कर लादण्याच्या भीतीमुळे गुंतवणूकदारांचा मूड बिघडला. गिफ्ट निफ्टी सध्या २५,०५० च्या जवळ स्थिर आहे, तर डाऊ फ्युचर्समध्ये ७० अंकांची वाढ दिसून येत आहे. जपानमधील बाजार आज बंद राहतील.