Sensex-Nifty Closes Green : जागतिक पातळीवर आर्टिफिशियल इंटेलिजन्स कंपनी 'अँथ्रोपिक'ने नवीन ऑटोमेशन टूल्स लाँच केल्यामुळे जगभरातील आयटी क्षेत्रात खळबळ माजली आहे. याचे पडसाद आज भारतीय शेअर बाजारातही उमटले. निफ्टी आयटी निर्देशांकात तब्बल ६ टक्क्यांची मोठी घसरण झाली असली, तरी ऑटो, मेटल, रियल्टी आणि कंज्यूमर ड्यूरेबल्स क्षेत्रातील खरेदीमुळे बाजार सावरला. दिवसभराच्या चढ-उतारानंतर सेन्सेक्स आणि निफ्टीने किरकोळ वाढीसह हिरव्या निशाणात बंद होण्यात यश मिळवले.
आयटीत घसरण होऊनही गुंतवणूकदार मालामाल
बाजार एका मर्यादित कक्षेत राहिला असला, तरी गुंतवणूकदारांच्या एकूण संपत्तीत मात्र वाढ झाली आहे. ३ फेब्रुवारी रोजी बीएसईवरील सूचीबद्ध कंपन्यांचे एकूण मार्केट कॅप ४,६७,१४,७५४.७७ कोटी रुपये होते, जे आज वाढून ४,६८,७३,६१२.६३ कोटींवर पोहोचले आहे. म्हणजेच आज एका दिवसात गुंतवणूकदारांच्या भांडवलात १,५८,८५७.८६ कोटींची भर पडली आहे.
प्रमुख निर्देशांकांची स्थिती
- सेंसेक्स : ७८.५६ अंकांच्या (०.०९%) किरकोळ वाढीसह ८३,८१७.६९ वर बंद.
- निफ्टी ५० : ४८.४५ अंकांच्या (०.१९%) वाढीसह २५,७७६.०० वर स्थिरावला.
- क्षेत्रीय कामगिरी : निफ्टी आयटी ६% कोसळला, तर कंज्यूमर ड्यूरेबल्स २% आणि ऑटो-मेटल इंडेक्स १ टक्क्यांहून अधिक वधारले.
'इटर्नल' आणि 'ट्रेंट'चे वर्चस्व; आयटी दिग्गज पिछाडीवर
सेंसेक्समधील ३० पैकी २२ शेअर्स तेजीसह बंद झाले. यामध्ये इटर्नल, ट्रेंट आणि एनटीपीसी यांच्या शेअर्समध्ये सर्वाधिक खरेदी दिसून आली. तर आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपन्या इन्फोसिस, टीसीएस आणि एचसीएल टेक यांचे शेअर्स घसरणीसह बंद झाले.
वाचा - अनिल अंबानींच्या मागे आता 'SIT'चा ससेमिरा! सर्वोच्च न्यायालयाचे सीबीआय आणि ईडीला कडक आदेश
बाजाराची रुंदी मजबूत
बीएसईवर आज एकूण ४,३६६ शेअर्समध्ये व्यवहार झाले. त्यापैकी २,७२४ शेअर्स वधारले, तर १,४८० शेअर्समध्ये घसरण झाली. विशेष म्हणजे ८९ शेअर्सनी वर्षभरातील उच्चांकी स्तर गाठला. २२३ शेअर्स अप्पर सर्किटला धडकले, तर १३४ शेअर्स लोअर सर्किटमध्ये अडकले.
