Prince Al Waleed bin Khalid bin Talal Al Saud : जगभरात 'स्लीपिंग प्रिन्स' या नावाने प्रसिद्ध असलेले सौदी राजघराण्याचे प्रिन्स अल-वलीद बिन खालिद बिन तलाल अल सौद यांचे निधन झाले. गेल्या २० वर्षांपासून ते कोमात होते. त्यांच्या निधनाच्या बातमीने केवळ सौदी अरेबियाच नाही, तर संपूर्ण अरब जग भावनिक झाले आहे.
एका घटनेने बदललं आयुष्य
अल-वलीद यांचा जन्म एप्रिल १९९० मध्ये झाला होता. ते प्रिन्स खालिद बिन तलाल यांचे मोठे पुत्र होते, आणि प्रसिद्ध अरब अब्जाधीश उद्योगपती प्रिन्स अल-वलीद बिन तलाल यांचे पुतणे देखील होते. २००५ मध्ये, वयाच्या अवघ्या १५ व्या वर्षी त्यांचे आयुष्य पूर्णपणे बदलले. लंडनमध्ये लष्करी कॅडेट प्रशिक्षण घेत असताना त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि अंतर्गत रक्तस्त्राव झाला. या अपघातामुळे ते कोमात गेले आणि त्यानंतर त्यांना कधीही शुद्धीवर आले नाही.
२० वर्षांची अविरत प्रतीक्षा आणि वडिलांचा अतूट विश्वास
प्रिन्स अल-वलीद यांच्यावर शक्य तितके सर्वोत्तम उपचार देण्यासाठी डॉक्टर मंडळींनी अमेरिका आणि स्पेनमधून विशेष पथके बोलावली. पण वैद्यकीय शास्त्राच्या मर्यादा असूनही, त्यांचे वडील प्रिन्स खालिद यांनी मात्र आपल्या मुलाचा 'लाईफ सपोर्ट' काढण्यास ठामपणे नकार दिला. त्यांचा अल्लाहच्या इच्छेवर आणि नशिबावर पूर्ण विश्वास होता.
प्रिन्स खालिद यांनी त्यांच्या मुलाला व्हेंटिलेटरवरून काढलं नाही, उपचार थांबवले नाहीत आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रार्थना करणे कधीही सोडले नाही. दररोज ते आपल्या मुलाजवळ बसायचे, कुराण वाचायचे. कधी मुलाच्या बोटांच्या किंचित हालचाली पाहून त्यांना आशा वाटायची, तर कधी पापण्यांच्या उघडझापीवर त्यांना विश्वास बसायचा की त्यांचा मुलगा एक दिवस नक्कीच बरा होईल.
आयसीयू रूम बनली श्रद्धेचे केंद्र
प्रिन्स अल-वलीद यांच्या आयसीयू रूमचे रूपांतर हळूहळू श्रद्धा आणि प्रार्थनेच्या एका पवित्र स्थळात झाले. दररोज तिथे कुराणातील आयतींचे पठण केले जात असे. अनेक धार्मिक विद्वान, हितचिंतक आणि सामान्य लोकही त्यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करण्यासाठी तिथे येत असत.
वाचा - १० सेकंदाच्या व्हिडीओनं अब्जाधीश कंपनीच्या सीईओंनी गमावलं पद, पत्नीनेही उचललं मोठं पाऊल!
मृत्यूची बातमी आणि अंतिम निरोप
अखेरीस, १९ जुलै रोजी सौदी प्रेस एजन्सीद्वारे राजघराण्याने प्रिन्स अल-वलीद बिन खालिद यांच्या निधनाची अधिकृत घोषणा केली. त्यांच्या निधनाबद्दल त्यांचे वडील प्रिन्स खालिद यांनी 'एक्स' (पूर्वीचे ट्विटर) वर एक भावनिक पोस्ट लिहली. त्यांनी म्हटले, "आम्ही आमचा मुलगा अल-वलीदच्या मृत्यूबद्दल जड अंतःकरणाने शोक व्यक्त करतो, अल्लाहच्या इच्छेवर आणि नशिबावर विश्वास ठेवतो. अल्लाह त्याला दया देवो." या बातमीने संपूर्ण अरब जगभरातून हळहळ व्यक्त होत आहे.