Mutual Funds : गेल्या काही वर्षांपासून म्युच्युअल फंड्समधील एसआयपीने गुंतवणुकीची परिभाषा बदलली आहे. शिस्तबद्ध गुंतवणूक आणि चक्रवाढ व्याजाचा फायदा घेण्यासाठी सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन क्रांतीकारक ठरत आहे. पण, उत्पन्न आणि आर्थिक उद्दिष्ट्ये बदलत असताना, पारंपरिक 'फिक्स्ड एसआयपी'ला आता 'स्टेप-अप एसआयपी'कडून मोठी स्पर्धा मिळत आहे. स्टेप-अप एसआयपीमुळे गुंतवणुकीची रक्कम दरवर्षी आपोआप वाढते, जी तुमच्या वाढत्या उत्पन्नाशी सुसंगत राहून महागाईला धोबीपछाड देते. स्टेप-अप एसआयपीच्या माध्यमातून तुम्ही ५ ते १० वर्षे आधीच तुमचं आर्थिक उद्धीष्ट गाठू शकता.
एसआयपी म्हणजे काय?
यात गुंतवणूकदार ठराविक रक्कम (उदा. ५,००० रुपये) नियमितपणे (उदा. मासिक) गुंतवतो. यामुळे गुंतवणुकीत शिस्त येते आणि बाजाराच्या वेळेचा ताण कमी होतो. जर तुम्ही ५,००० रुपयांची मासिक SIP १५ वर्षांसाठी १२% वार्षिक परताव्यासह केली, तर तुमची एकूण गुंतवणूक ९ लाख रुपये होईल, जी चक्रवाढ व्याजाने सुमारे २४ लाख रुपये होईल.
स्टेप-अप एसआयपी
यात तुमची गुंतवणुकीची रक्कम दरवर्षी एका निश्चित टक्केवारीने (उदा. १०%) आपोआप वाढते. हे तुमच्या पगारातील वाढीनुसार बचत वाढवण्यास मदत करते आणि महागाईवर मात करण्यात मदत करते. जर तुम्ही ५,००० रुपयांची मासिक एसआयपी सुरू केली आणि दरवर्षी ती १०% ने वाढवली, तर १५ वर्षांत तुमची एकूण गुंतवणूक १५.३ लाख रुपये होईल आणि त्याचे मॅच्युरिटी मूल्य सुमारे ३६ लाख रुपये होईल.
स्टेप-अप एसआयपीची खरी ताकद
जर तुम्ही १०,००० रुपयांच्या एसआयपीने सुरुवात केली आणि दरवर्षी ती १०% ने वाढवली (१५% वार्षिक वृद्धी दराने), तर ती १५ वर्षांत १ कोटी, २१ वर्षांत ३ कोटी आणि २९ वर्षांत १० कोटींपर्यंत पोहोचू शकते. याद्वारे तुम्ही ८८.२ लाख रुपये गुंतवून ११.१२ कोटी जमा करू शकता, ज्यापैकी ९०% रक्कम चक्रवाढ व्याजातून येते!
स्टेप-अप एसआयपी कोणी निवडावी?
- पगारदार व्यावसायिक आणि तरुण कमावते लोक : ज्यांचे उत्पन्न दरवर्षी वाढते, त्यांच्यासाठी ही योजना उत्तम आहे.
- दीर्घकालीन ध्येय असणारे : निवृत्ती किंवा मुलांचे शिक्षण यांसारख्या मोठ्या उद्दिष्टांसाठी ही योजना अत्यंत उपयुक्त आहे.
- उशिरा गुंतवणूक सुरू करणारे (४०+ वयोगट): ज्यांनी उशिरा गुंतवणूक सुरू केली, त्यांच्यासाठी ही योजना सुरुवातीला कमी रकमेतून सुरुवात करून लवकर मोठा कॉर्पस जमा करण्यास मदत करते.
- शिस्तीचे पालन करू न शकणारे : ज्यांना पगारात वाढ झाल्यावर दरवर्षी स्वतःहून गुंतवणुकीची रक्कम वाढवता येत नाही, त्यांच्यासाठी ही योजना बचत वाढवण्याची शिस्त आपोआप लावते.
स्टेप-अप एसआयपीचे काही अडथळे
- दरवर्षी एसआयपीची रक्कम आपोआप वाढते. उत्पन्नात वाढ न झाल्यास किंवा अनपेक्षित खर्च आल्यास, वाढलेली एसआयपीची रक्कम कायम ठेवणे जड वाटू शकते.
- मासिक गुंतवणुकीत १०-२०% ची आक्रमक वाढ निवडल्यास, रोख प्रवाहाचा अंदाज नसेल तर, पेमेंट चुकण्याची किंवा गुंतवणूक लवकर थांबवण्याची शक्यता असते.
- नोकरी गमावणे, कुटुंबातील नवीन जबाबदाऱ्या किंवा अनपेक्षित खर्च यांसारख्या जीवनमानातील अनिश्चिततांमुळे वाढलेली एसआयपी सुरू ठेवणे कठीण होऊ शकते. त्यामुळे तुम्ही टिकवून ठेवू शकता तेवढीच रक्कम वाढवण्याची बांधिलकी ठेवा.
वाचा - डिजिटल गोल्डची मागणी ४७% ने कोसळली! सेबीच्या 'या' इशाऱ्याने गुंतवणूकदारांची धाकधूक वाढली
(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. शेअर बाजारातील गुंतवणूक जोखमीच्या अधीन असते. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)
