Share Market Above 94000: एचएसबीसीनं (HSBC) भारतीय शेअर बाजारावरील आपला दृष्टिकोन बदलला आहे. त्यांनी भारताला 'न्यूट्रल' वरून 'ओव्हरवेट'मध्ये अपग्रेड केलं आहे. एचएसबीसीचा अंदाज आहे की, २०२६ च्या अखेरपर्यंत सेन्सेक्स ९४,००० चा आकडा गाठेल. "हा बदल चांगल्या बाजार मूल्यांकनामुळे (market valuation), सरकारच्या उत्तम धोरणांमुळे आणि देशांतर्गत गुंतवणूकदारांच्या सातत्यपूर्ण सहभागामुळे झाला आहे," असं एचएसबीसीनं म्हटलंय. फर्मनं सेन्सेक्सचं टार्गेट ९४,००० ठेवलं आहे, याचा अर्थ सध्याच्या पातळीवरून त्यात १३% पेक्षा जास्त वाढ होऊ शकते.
ईटीच्या रिपोर्टनुसार, एचएसबीसीच्या आशिया केंद्रित इक्विटी दृष्टिकोनात हा एक मोठा बदल आहे. आशियातील बदलत्या वातावरणात भारत एक आकर्षक बाजार म्हणून समोर येत आहे. एचएसबीसीच्या ताज्या अहवालात असं म्हटलंय की, गेल्या एका वर्षात जरी परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर्समधील आपली होल्डिंग कमी केली असली तरी, देशांतर्गत गुंतवणूकदारांनी आपली मजबूत उपस्थिती कायम ठेवली आहे. यामुळे बाजारात स्थिरता टिकून आहे.
परदेशी बाजारांची स्थिती
फर्मचं मत आहे की, भारत इतर आशियाई बाजारपेठांच्या, विशेषतः कोरिया आणि तैवानच्या तुलनेत खूप स्थिर राहिला आहे. या स्थिरतेचं कारण सहायक धोरणं आणि मजबूत मॅक्रोइकॉनॉमिक फंडामेंटल्स आहेत. एचएसबीसीने सांगितलं की, भारत आकर्षक आहे कारण येथे कमाईचे मूल्यांकन संतुलित आहे, परदेशी गुंतवणुकीचा धोका कमी आहे आणि सरकार सुधारणा व भांडवली खर्चातून चालणाऱ्या वाढीसाठी कटिबद्ध आहे. या सर्व गोष्टी मध्यम ते दीर्घ कालावधीत शेअर बाजाराच्या चांगल्या कामगिरीसाठी एक मजबूत आधार देतात.
नफावसुलीमुळे शेअर बाजारात घसरण
भारतीय शेअर बाजारात सलग चौथ्या दिवशीही घसरण झाली. मंगळवारी सेन्सेक्स ३८६.४७ अंकांनी (०.४७%) घसरून ८१,७१५.६३ वर बंद झाला, तर निफ्टी ११२.६० अंकांनी (०.४५%) घसरून २५,०५६.९० वर आला. तज्ज्ञांनुसार, या घसरणीमागे मुख्य कारण बँक, ऑटो आणि कॅपिटल गुड्स क्षेत्रातील नफावसुली, परदेशी फंडांची बाहेर पडणारी गुंतवणूक आणि अमेरिकेच्या H-1B व्हिसा शुल्क वाढल्यानं गुंतवणूकदारांमध्ये असलेली चिंता ही आहेत. एफपीआयनं मंगळवारी ३,५५१ कोटी रुपयांचे शेअर्स विकले. मिडकॅप आणि स्मॉलकॅपचे शेअर्सही खराब कामगिरी करत आहेत. चार दिवसांत सेन्सेक्स सुमारे १,२९८ अंक किंवा १.५६% आणि निफ्टी ३६६ अंक किंवा १.४४% घसरला आहे.