मुंबई - शेअर बाजार नियामक सेबीच्या नव्या अध्यक्षपदाचा शोध सुरू झाला आहे. सरकारने या महत्त्वाच्या पदासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या पदासाठी इच्छुकांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. सध्याच्या अध्यक्षा माधबी पुरी बुच यांचा कार्यकाळ २८ फेब्रुवारीला संपणार आहे. या पदावर सरकार नव्या चेहऱ्याला संधी देणार आहे. आज या पदासाठी जाहिरात देऊन सरकारने सेबीच्या पहिल्या महिला अध्यक्षा माधबी पुरी बुच यांना मुदतवाढ न देण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत.
माधबी पुरी बुच यांनी २ मार्च २०२२ साली सेबीच्या अध्यक्षपदाचा कार्यभार सांभाळला. खासगी क्षेत्रातून या पदावर नियुक्त होणाऱ्या त्या पहिल्याच व्यक्ती होत्या. त्यांच्या नेतृत्वात सेबीने अनेक बडे निर्णय घेतले त्याशिवाय त्यांचा कार्यकाळ बऱ्याचदा वादात सापडला. सोमवारी अर्थ मंत्रालयाच्या विभागाने सार्वजनिकरित्या या पदासाठी जाहिरात प्रसिद्ध करून अर्ज मागवले आहेत. या पदावरील नियुक्ती कमाल ५ वर्ष असेल अथवा उमेदवाराचं वय ६५ वर्ष झाले तर त्यांचा कार्यकाळ संपुष्टात येईल. या पदासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख १७ फेब्रुवारी देण्यात आली आहे.
सेबी अध्यक्षपदासाठी २ प्रकारचे वेतन पर्याय आहेत. ज्यात पहिला केंद्र सरकारच्या सचिवाच्या समांतर सॅलरी अथवा ५ लाख ६२ हजार ५०० दर महिन्याला दिले जातील. ज्यात घर आणि वाहनाची सुविधा नसेल. बुच यांच्याआधी सेबीच्या अध्यक्षपदी अजय त्यागी यांनी मार्च २०१७ ते फेब्रुवारी २०२२ या काळात ५ वर्ष जबाबदारी सांभाळली.
या पदासाठी उमेदवारांची पात्रता काय हवी?
उमेदवाराचे वय ५० हून अधिक नको
उमेदवाराकडे किमान २५ वर्षाचा व्यावसायिक अनुभव असायला हवा
उमेदवाराकडे बाजार, कायदा, अर्थशास्त्र अथवा अकाऊंटेंसीचे विशेष ज्ञान, अनुभव हवा
उमेदवार प्रामाणिक आणि निष्कलंक हवा
माधबी पुरी बुच यांचा वादग्रस्त कार्यकाळ
माधबी पुरी बुच यांचा सेबीच्या अध्यक्षपदाचा कार्यकाळ अनेक वादांनी घेरला गेला आहे. विरोधी पक्ष आणि काँग्रेसने बुच यांच्या राजीनाम्याची मागणीही केली होती. गेल्या वर्षी माधबी पुरी बुच यांच्यावर अदानी समूहाशी संबंधित ऑफशोअर फंडात गुंतवणूक करून आचारसंहितेचा भंग केल्याचा आरोप करण्यात आला होता. या विरोधात सेबीच्या कर्मचाऱ्यांनी मुंबईतील सेबीच्या मुख्यालयात आंदोलनही केले होते.