Scalesauce Stock Listing: स्केलसॉसची (एनकॉम्पस डिझाइन इंडिया) आज शेअर बाजारात दणदणीत सुरुवात झाली आहे. कंपनीचे शेअर्स ९० टक्के नफ्यासह २०३.३० रुपये पातळीवर लिस्ट झाले. आयपीओमध्ये स्केलसॉसच्या शेअरची किंमत १०७ रुपये होती. विशेष म्हणजे, स्केलसॉसच्या आयपीओला फारसा उत्साही प्रतिसाद मिळाला नव्हता आणि त्याला फक्त २ पटीहून थोडा जास्त प्रतिसाद मिळाला होता.
स्केलसॉसचा (एनकॉम्पस डिझाइन इंडिया) आयपीओ ५ डिसेंबर २०२५ रोजी गुंतवणुकीसाठी खुला झाला होता आणि ९ डिसेंबरपर्यंत तो खुला होता. या आयपीओचा एकूण आकार ४०.२१ कोटी रुपयांपर्यंत होता.
मॅक्सिको भारतावर नाही तर आपल्याच प्रगतीवर टाळं लावतोय, फेडावी लागेल मोठी किंमत
लिस्टिंगनंतर शेअर्सवर विक्रीचा दबाव
दमदार लिस्टिंगनंतर स्केलसॉसच्या (एनकॉम्पस डिझाइन इंडिया) शेअर्सवर विक्रीचा दबाव दिसून आला. लिस्टिंगनंतर कंपनीचे शेअर्स ५ टक्क्यांनी घसरून १९३.१५ रुपये पातळीवर पोहोचले. कंपनीची सुरुवात मार्च २०१० मध्ये झाली. एनकॉम्पस डिझाइन इंडिया ही स्केलसॉस या नावाने ओळखली जाते. कंपनीचा मुख्य व्यवसाय होम, लिव्हिंग आणि फूड सेगमेंटवर केंद्रित आहे. कंपनी 'स्केलसॉस' या ब्रँड नावाने व्यवसाय करते.
फक्त २.१९ पट सबस्क्राइब झाला होता आयपीओ
स्केलसॉसचा (एनकॉम्पस डिझाइन इंडिया) आयपीओ एकूण २.१९ पट सबस्क्राइब झाला होता. कंपनीच्या आयपीओमध्ये किरकोळ गुंतवणूकदार श्रेणीत १.६९ पट बोली लागली. गैर-संस्थात्मक गुंतवणूकदार (NII) श्रेणीत आयपीओला ४.६० पट सबस्क्रिप्शन मिळालं. क्वालिफाइड इन्स्टिट्यूशनल बायर्सचा (QIB) कोटा १.२५ पट सबस्क्राइब झाला होता.
आयपीओमध्ये सामान्य गुंतवणूकदार फक्त २ लॉटसाठी बोली लावू शकत होते. आयपीओच्या २ लॉटमध्ये २४०० शेअर्स होते. याचा अर्थ, सामान्य गुंतवणूकदारांना आयपीओमध्ये किमान २,५६,८०० रुपये गुंतवावे लागले.
अमित राजेंद्रप्रसाद डालमिया, सुष्मिता अमित डालमिया, रुमन कैलाश अग्रवाल आणि योगेंद्र वशिष्ठ हे कंपनीचे प्रवर्तक आहेत. आयपीओपूर्वी स्केलसॉसमध्ये (एनकॉम्पस डिझाइन इंडिया) प्रवर्तकांची भागीदारी ८०.१९ टक्के होती.
(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)
