PPF Interest Rate and Benefits: जर तुम्हाला कमी जोखीम पत्करून गॅरंटीड परतावा आणि टॅक्समध्ये सवलत हवी असेल, तर सरकारी योजना 'पब्लिक प्रॉव्हिडंट फंड' (PPF) हा तुमच्यासाठी उत्तम पर्याय आहे. पीपीएफमध्ये गुंतवणुकीचा कालावधी १५ वर्षांचा असतो, जो ५-५ वर्षांच्या ब्लॉकनुसार वाढवता येतो. निवृत्तीसाठी मोठा निधी जमा करण्याचं हे एक उत्कृष्ट साधन आहे.
पीपीएफमध्ये किमान आणि कमाल गुंतवणूक
एक व्यक्ती पीपीएफ खात्यात वर्षाला किमान ₹५०० आणि कमाल ₹१.५ लाख गुंतवणूक करू शकते. सध्या सरकार पीपीएफवर वार्षिक ७.१०% दरानं व्याज देत आहे. यामध्ये व्याजाची गणना वार्षिक चक्रवाढ पद्धतीनं केली जाते, म्हणजेच व्याजावरही व्याज मिळते.
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
महिन्याला ₹१२,००० ची बचत कशी बनवेल कोट्यधीश?
जर तुम्ही दरमहा ₹१२,००० (म्हणजेच वार्षिक ₹१.४४ लाख) जमा केले, तर १५ वर्षांनंतर तुमची मॅच्युरिटी रक्कम सुमारे ₹३९.०५ लाख असेल. यामध्ये तुमची एकूण गुंतवणूक ₹२१.६ लाख आणि व्याज ₹१७.४५ लाख असेल. जर तुम्ही ही गुंतवणूक २० वर्षांपर्यंत चालू ठेवली तर हा फंड सुमारे ₹६४ लाख होईल आणि २५ वर्षांत ही रक्कम जवळपास ₹१ कोटी रुपये होईल.
महिन्याला ₹१०,००० वाचवल्यास किती परतावा?
जर तुम्ही दरमहा ₹१०,००० (वार्षिक ₹१.२ लाख) वाचवून गुंतवणूक केली, तर १५ वर्षांत तुम्हाला सुमारे ₹३२.५ लाख मिळतील. यामध्ये १८ लाख रुपये तुमची गुंतवणूक आणि १४.५ लाख रुपये व्याज असेल. जर ५ वर्षांची मुदतवाढ घेऊन २० वर्षांपर्यंत पैसे जमा केले, तर तुम्हाला ₹५३.२ लाख मिळतील आणि २५ वर्षांत ही रक्कम ₹८२.४ लाख होईल.
महिन्याला ₹५,००० जमा केल्यावर मिळणारा परतावा
जर तुम्ही दरमहा ₹५,००० (वार्षिक ₹६०,०००) ७.१०% व्याजानं गुंतवले, तर १५ वर्षांत तुम्हाला सुमारे ₹१६.२ लाख मिळतील. यामध्ये तुमची एकूण गुंतवणूक ₹९ लाख आणि व्याज सुमारे ₹७.२ लाख असेल. २० वर्षांपर्यंत गुंतवणूक सुरू ठेवल्यास तुम्हाला ₹२६.६ लाख मिळतील आणि २५ वर्षांपर्यंत जमा केल्यास तुमच्या हातात ₹४१.२ लाख असतील, ज्यामध्ये एकट्या व्याजाचा वाटा ₹२६.२ लाखांहून अधिक असेल.
पीपीएफमध्ये व्याज कसं मिळतं?
पीपीएफमध्ये व्याजाची गणना प्रत्येक महिन्याच्या ५ तारखेपासून ते महिन्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत असलेल्या सर्वात कमी शिल्लक रकमेवर केली जाते. त्यामुळे अधिक व्याज मिळवण्यासाठी प्रत्येक महिन्याच्या ५ तारखेपूर्वी खात्यात पैसे जमा करावेत. तुम्ही ही रक्कम १२ महिन्यांच्या हप्त्यांमध्ये किंवा एकदाच जमा करू शकता.
टॅक्स सवलतीचा फायदा
टॅक्सच्या बाबतीत पीपीएफ ही सर्वात फायदेशीर योजना आहे, कारण ती EEE (एक्झम्प्ट-एक्झम्प्ट-एक्झम्प्ट) श्रेणीत येते. कलम 80C अंतर्गत वर्षाला ₹१.५ लाखांपर्यंतची गुंतवणूक टॅक्स-फ्री आहे. खात्यात मिळणारं व्याज पूर्णपणे टॅक्स-फ्री आहे. १५ वर्षांनंतर मिळणारी मॅच्युरिटीची एकूण रक्कम देखील पूर्णपणे करमुक्त असते.
