Sanofi Consumer Healthcare Dividend: फार्मा क्षेत्रातील सनोफी कंझ्युमर हेल्थकेअर कंपनीनं डिसेंबर तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले आहेत. या निकालांसोबतच कंपनीनं आपल्या गुंतवणूकदारांना लाभांशाची भेट दिली आहे. या सकारात्मक बातमीमुळे गुरुवारी शेअर बाजारातगुंतवणूकदारांनी या कंपनीच्या शेअर्सवर खरेदीसाठी गर्दी केली. कंपनीच्या संचालक मंडळानं ३१ डिसेंबर २०२५ रोजी संपलेल्या वर्षासाठी १० रुपये फेस व्हॅल्यू असलेल्या प्रत्येक शेअरवर ७५ रुपये अंतिम लाभांश देण्याची शिफारस केली आहे. आगामी वार्षिक सर्वसाधारण सभेत (AGM) भागधारकांच्या मंजुरीनंतर हा लाभांश दिला जाईल. लाभांश वितरणासाठी रेकॉर्ड डेट आणि बुक क्लोजरची माहिती अद्याप देण्यात आलेली नाही.
तिमाही निकालांची सविस्तर आकडेवारी
सनोफीनं आर्थिक वर्ष २०२५ च्या चौथ्या तिमाहीत आपल्या निव्वळ नफ्यात वार्षिक ५०.११% ची वाढ नोंदवली असून ६६.५ कोटी रुपयांचा नफा कमावला. गेल्या वर्षी याच कालावधीत कंपनीचा नफा ४४.३ कोटी रुपये होता. कंपनीचा परिचालन महसूल या तिमाहीत ४७.०४% नं वाढून २५१ कोटी रुपयांवर पोहोचला, जो आर्थिक वर्ष २०२४ च्या चौथ्या तिमाहीत १७०.७ कोटी रुपये होता.
'सहारा इंडिया'तील गुंतवणूकदारांसाठी संधी; १० लाखांपर्यंतचे क्लेम पुन्हा करता येणार, पाहा डिटेल्स
कंपनीनं दिलेल्या माहितीनुसार, बाजारात काही उत्पादनं पुन्हा लाँच केल्यामुळे देशांतर्गत विक्रीत २३% वाढ झाली आहे, तर कमी बेस असल्यामुळे निर्यात विक्रीमध्ये ९.३ पटीनं वाढ झाली आहे. संपूर्ण २०२५ वर्षासाठी कंपनीनं ८७८.४ कोटी रुपयांचा महसूल नोंदवला असून ही गेल्या वर्षीच्या तुलनेत २१% वाढ आहे.
कंपनीच्या व्यवस्थापनानं काय म्हटलं?
सनोफी कंझ्युमर हेल्थकेअरचे व्यवस्थापकीय संचालक हिमांशु बख्शी यांनी निकालांवर समाधान व्यक्त करताना सांगितलं की, कंपनीच्या देशांतर्गत व्यवसायाने सलग दोन तिमाहींमध्ये दुहेरी अंकी वाढ नोंदवली आहे. या वाढीला निर्यात बाजारातील मजबूत योगदानामुळे अधिक बळ मिळालंय. कंपनी आपल्या ब्रँड्समध्ये गुंतवणूक करणं सुरूच ठेवणार असून, शाश्वत विकासाचा पुढील टप्पा गाठण्यासाठी मूलभूत तत्त्वं मजबूत करण्यावर आणि परिचालन उत्कृष्टतेला चालना देण्यावर त्यांचा भर असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
कंपनीची पार्श्वभूमी आणि प्रमुख ब्रँड्स
सनोफी कंझ्युमर हेल्थकेअर ही सनोफी इंडियाच्या कंझ्युमर हेल्थकेअर विभागातून डिमर्जर होऊन बनलेली एक स्वतंत्र कंपनी आहे. कंपनीच्या बोर्डानं १० मे २०२३ रोजी या डिमर्जरला मंजुरी दिली होती आणि १ जून २०२४ पासून ही कंपनी पूर्णपणे स्वतंत्रपणे कार्यरत झाली. या कंपनीच्या प्रमुख ब्रँड्समध्ये ॲलेग्रा, डेप्यूरा (व्हिटॅमिन डी सप्लिमेंट), एविल (ॲलर्जी आणि सर्दी) आणि कॉम्बिफ्लाम (वेदना आणि तापावरील औषध) यांचा समावेश आहे.
(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)
