jeff bezos salary : भारतीयांना कोणाच्याही पगाराचं मोठ्ठ आकर्षण असतं. म्हणजे तुम्ही नोकरी करत असाल तर तुम्हाला आतापर्यंत कोणीही पगार विचारला नाही असं झालं नसणार. हे इतकं वाढलंय की महिलांना वय आणि पुरुषांना पगार विचारू नये, इथपर्यंत पोहचलंय. अशात जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेल्या जेफ बेझोस यांचा पगार माहिती आहे का? अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांनी स्वतःच याचा खुलासा केला आहे.
अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस दरवर्षी फक्त ८०,००० डॉलर्स (जवळपास ६७ लाख रुपये) इतका नाममात्र पगार घेतात. विशेष म्हणजे १९९८ पासून त्यांच्या मूळ पगारात कोणताही बदल झालेला नाही. असे असतानाही बेझोस जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत अव्वल स्थानावर आहेत. ऑक्टोबर २०२४ पर्यंत जेफ बेझोस जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती होते. आता टेस्लाचे सीईओ इलॉन मस्क यांनी त्यांना मागे टाकले आहे. न्यूयॉर्क टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत बेझोस म्हणाले की, पगार कमी ठेवण्याचा निर्णय जाणूनबुजून घेतला होता. ते म्हणाले की मी संस्थापक आहे. त्यांच्याकडे आधीच कंपनीचा मोठा हिस्सा आहे. अशा परिस्थितीत जास्त पगार घेणे त्यांना सोयीचे वाटत नाही.
का घेतात कमी पगार?
पगार कमी ठेवण्यामागचे कारणही बेझोस यांनी स्पष्ट केले. त्यांनी मुलाखतीत सांगितले की अॅमेझॉनमध्ये त्यांची मोठी भागीदारी आहे, त्यामुळे अतिरिक्त पगाराची गरज नाही. त्यांचा अधिकृत पगार कमी असला तरी बेझोस यांनी कंपनीच्या शेअर्समधून लाखोंची कमाई केली आहे. Inc.com च्या अहवालानुसार, २०२३ आणि २०२४ दरम्यान, त्यांनी दर तासाला त्याच्या स्टॉकमधून ८ दशलक्ष डॉलर कमावले.
बेझोस यांनी २०२१ मध्ये, कंपनीच्या सीईओ पदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्यांनी हळूहळू कंपनीचे काही शेअर्स खरेदी केले. फॉर्च्युनच्या अहवालानुसार ते २०२५ च्या अखेरीस २५ दशलक्ष शेअर्स विकण्याची योजना आखत आहे. बेझोस यांनी कंपनीकडे कोणत्या अतिरिक्त भत्त्याची मागणी केली नाही.
अगदी प्रोपब्लिकाच्या २०२१ च्या पुनरावलोकन अहवालात असे म्हटले आहे की बेझोस यांनी २००७ आणि २०११ मध्ये कोणताही फेडरल आयकर भरला नाही. अहवालात असे म्हटले आहे की बेझोस यांनी प्रत्यक्षात त्यांच्या पगारापेक्षा जास्त गुंतवणुकीचे नुकसान दाखवले, ज्यामुळे त्यांना त्या वर्षांत कर टाळण्यास मदत झाली.