Sahara Group : सहारा समूहाच्या गुंतवणूक योजनांमध्ये देशभरातील लाखो ठेवीदारांचे पैसे अनेक वर्षांपासून अडकून पडले आहेत. याच पार्श्वभूमीवर, केंद्र सरकारने याच वर्षी जुलैमध्ये एक विशेष पोर्टल सुरू केले आहे, ज्यामुळे सहाराच्या गुंतवणूकदारांना त्यांचे अडकलेले पैसे परत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर केंद्र सरकारने सहारा समूहाच्या चार सहकारी सोसायट्यांच्या ठेवीदारांसाठी परताव्याची प्रक्रिया सुरू केली आहे. यामुळे अनेक वर्षांपासून आपल्या कष्टाच्या कमाईची वाट पाहणाऱ्या लाखो गुंतवणूकदारांना मोठा दिलासा मिळाला आहे.
किती गुंतवणूकदारांना मिळणार परतावा?
सहारा कंपन्यांनी गुंतवणूकदारांकडून २४,००० कोटींपेक्षा जास्त रक्कम अवैध मार्गाने जमा केली आणि ती परत केली नाही, असा त्यांच्यावर आरोप आहे. या कंपन्या आणि त्यांचे मालक सुब्रत रॉय यांच्यावर पॉन्झी स्कीम चालवणे आणि मनी लॉन्ड्रिंगचे आरोप लागले होते. सप्टेंबरमध्ये केंद्र सरकारने माहिती दिली की, सुमारे ५.४३ कोटी गुंतवणूकदारांनी १,१३,५०४.१२४ कोटी रुपयांचा दावा केला होता. त्यापैकी २६,२५,०९० वास्तविक ठेवीदारांना एकूण ५,०५३.०१ कोटी रुपये परत केले गेले आहेत. डिसेंबर २०२६ पर्यंत सुमारे ३२ लाख गुंतवणूकदार आपले दावे दाखल करतील, असा अंदाज आहे.
कोणाला मिळेल रिफंड?
- ज्या गुंतवणूकदारांनी खालील चार सहारा ग्रुपच्या को-ऑपरेटिव्ह सोसायट्यांमध्ये पैसे गुंतवले होते, त्यांना आता परतावा मिळेल.
- सहारा क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड (लखनऊ)
- सहारायन युनिव्हर्सल मल्टीपर्पस सोसायटी लिमिटेड (लखनऊ)
- हमारा इंडिया क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड (कोलकाता)
- स्टार्स मल्टीपर्पस कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड
- या सोसायट्यांचे गुंतवणूकदार आता कोणत्याही कार्यालयात न जाता, ऑनलाइनच आपल्या परताव्याचा दावा करू शकतात.
सीआरसीएस सहारा रिफंड पोर्टल काय आहे?
सीआरसीएस (सेंट्रल रजिस्ट्रार ऑफ कोऑपरेटिव्ह सोसायटीज) सहारा रिफंड पोर्टल ही एक सरकारी वेबसाइट आहे. सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी परताव्याची प्रक्रिया सोपी आणि पारदर्शक करण्यासाठी ही वेबसाइट बनवण्यात आली आहे. हा एक सुरक्षित मार्ग आहे, ज्यात कोणत्याही मध्यस्थाची गरज नाही. ज्या गुंतवणूकदारांनी चारही सोसायट्यांमध्ये पैसे गुंतवले आहेत, ते एकच फॉर्म भरून सर्व ठेवींचा दावा करू शकतात.
रिफंड मिळवण्याची सोपी ऑनलाइन प्रक्रिया
- पोर्टलच्या होमपेजवर 'रजिस्ट्रेशन' वर क्लिक करा.
- तुमचा आधार क्रमांक आणि त्याला जोडलेला मोबाइल नंबर टाका. कॅप्चा भरून 'गेट ओटीपी' वर क्लिक करा आणि तो ओटीपी वेरिफाय करा.
- नोंदणीनंतर 'डिपॉझिटर लॉगिन' वर जाऊन ओटीपीने वेरिफाय करा. तुमची माहिती आपोआप दिसेल.
- 'क्लेम फॉर्म'मध्ये तुमच्या सोसायटीचे नाव निवडा, जमा रकमेचा तपशील द्या आणि पासबुक किंवा सर्टिफिकेट नंबरसारखी माहिती भरा.
योग्य कागदपत्रे आणि माहिती देऊन गुंतवणूकदार आता आपले अडकलेले पैसे परत मिळवू शकतात.
