RVNL Share: रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी रेल विकास निगम लिमिटेडच्या (RVNL) शेअर्समध्ये बुधवारी, २४ डिसेंबर रोजी देखील वाढ पाहायला मिळाली. संपूर्ण बाजारात फारशी हालचाल नसतानाही, हा शेअर सलग चौथ्या सत्रात ग्रीन झोनमध्ये व्यवहार करताना दिसला. आरव्हीएनएलचा शेअर ३४४ रुपयांवर उघडला, जो मागील ३४१.८५ रुपयांच्या बंद किमतीपेक्षा जास्त होता. सुरुवातीच्या व्यवहारातच या शेअरमध्ये तेजी कायम राहिली आणि तो ३४९.४० रुपयांच्या इंट्राडे उच्चांकावर पोहोचला. ऑक्टोबरच्या सुरुवातीनंतरची ही या शेअरची सर्वोच्च पातळी आहे. गेल्या चार दिवसांत या शेअरमध्ये सुमारे १४.२% वाढ झाली आहे.
शेअर्समधील वाढीची कारणं आणि भाडे दरवाढ
रेल्वे शेअर्समधील अलीकडील तेजीचं मुख्य कारण सरकारचा प्रवासी भाडं सुसूत्रीकरणाचा निर्णय असल्याचं मानलं जात आहे. वाढता खर्च संतुलित करण्यासाठी सरकारनं भाड्यात किंचित वाढ जाहीर केली आहे. नवीन भाडे संरचनेनुसार, २१५ किमी पेक्षा जास्त प्रवासासाठी साधारण श्रेणीचं भाडं १ पैसा प्रति किलोमीटरने वाढणार आहे. तसेच मेल-एक्सप्रेसच्या नॉन-एसी श्रेणीत आणि सर्व एसी वर्गांमध्ये २ पैसे प्रति किलोमीटरची समान वाढ होईल. हे बदल शुक्रवारपासून लागू होणार आहेत.
२६ डिसेंबरपासून आणखी एका कंपनीचा IPO उघडणार; आतापासून GMP ₹१२५ वर, कोणती आहे कंपनी?
या भाडेवाढीमुळे चालू आर्थिक वर्षाच्या उर्वरित कालावधीत रेल्वेला सुमारे ६०० कोटी रुपयांचे अतिरिक्त उत्पन्न मिळण्याचा अंदाज आहे. या वर्षातील ही दुसरी भाड्यातील सुधारणा असून, यापूर्वी १ जुलै २०२५ रोजीही भाडं वाढवण्यात आलं होतं. सध्या प्रवासी सेवा तोट्यात चालत आहेत कारण भाडं खर्चापेक्षा सुमारे ४५% कमी आहे आणि त्याची भरपाई मालवाहतुकीतून केली जाते. त्यामुळे रेल्वेची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.
नवीन ऑर्डर्स आणि दीर्घकालीन कामगिरी
आरव्हीएनएलला अलीकडे मिळालेल्या नवीन ऑर्डर्सनी देखील शेअरला आधार दिला आहे. कंपनीला North Eastern Railway कडून गंडक नदीवरील एका महत्त्वाच्या पुलाच्या सब-स्ट्रक्चर बांधकामाचं 'लेटर ऑफ अवॉर्ड' मिळालं आहे. मात्र, दीर्घकालीन दृष्टीकोनातून पाहिलं तर हा शेअर अजूनही दबावाखाली आहे.
जुलै २०२४ मधील ६४७ रुपयांच्या सर्वकालीन उच्चांकावरून तो सुमारे ४६% नं घसरला आहे आणि वार्षिक आधारावर अजूनही १८% खाली आहे. असं असले तरी, दीर्घ कालावधीत आरव्हीएनएलची कामगिरी भक्कम राहिली आहे. गेल्या २ वर्षांत सुमारे ४५०% आणि ५ वर्षांत सुमारे १४००% इतका उत्कृष्ट परतावा या कंपनीनं दिला आहे.
(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)
