Meesho IPO: बंगळुरुस्थित ई-कॉमर्स कंपनी मीशोचा (Meesho) आयपीओ (IPO) ३ डिसेंबर रोजी उघडणार आहे. या इश्यूमध्ये ४,२५० कोटी रुपयांचे नवीन शेअर्स जारी केले जातील, तर सार्वजनिक भागधारक ऑफर-फॉर-सेलद्वारे १०.५५ कोटी इक्विटी शेअर्स विकतील. अँकर बुक २ डिसेंबरला उघडेल आणि पब्लिक इश्यू ५ डिसेंबरपर्यंत सबस्क्रिप्शनसाठी उपलब्ध राहील.
शेअर्सचे अलॉटमेंट ८ डिसेंबरला निश्चित केलं जाईल आणि १० डिसेंबरपासून हे शेअर्स स्टॉक एक्स्चेंजवर उपलब्ध होतील. मीशो आयपीओचा प्राइस बँड (Price Band) १०५ रुपये ते १११ रुपये प्रति शेअर निश्चित करण्यात आला आहे. कंपनी बाजारात लिस्ट झाल्यानंतर कंपनीचे दोन्ही संस्थापक विदित आत्रेय आणि संजय कुमार यांना सर्वाधिक फायदा होईल. मीशो आयपीओच्या हाय प्राइस बँडवर कंपनीचं एकूण मूल्य सुमारे ५०,०९५.७५ कोटी रुपयांपर्यंत पोहोचते.
रिलायन्स इंडस्ट्रीजला ५६.४४ कोटी रुपयांची जीएसटी नोटीस, पाहा काय आहे प्रकरण?
सीईओ विदित आत्रेय यांना जबरदस्त फायदा
मीशोचे सह-संस्थापक, अध्यक्ष आणि सीईओ विदित आत्रेय हे या आयपीओच्या सर्वात मोठ्या लाभार्थ्यांपैकी एक असतील. विदित यांच्याकडे ४७.२५ कोटी शेअर्स आहेत, जे कंपनीतील ११.१ टक्के हिस्सा दर्शवतात. त्यांनी हे शेअर्स केवळ ०.०६ रुपये प्रति शेअर च्या सरासरी किमतीत खरेदी केले होते. आयपीओचा प्राइस बँड १११ रुपये निश्चित झाल्यामुळे, विदित यांच्या हिस्स्याचं मूल्य सुमारे ५२४५ कोटी रुपयांच्या आसपास पोहोचतं.
याचा अर्थ असा की, विदित यांनी कंपनीत गुंतवलेले २.८४ कोटी रुपये आता १८०० पटींनी वाढले आहेत. भारतीय स्टार्टअप इतिहासातील संस्थापकांना मिळालेल्या सर्वात मोठ्या मूल्यमापन वाढीपैकी हा एक मानला जात आहे.
संजय कुमार यांनाही मोठा नफा
विदित यांच्याप्रमाणेच सह-संस्थापक आणि सीटीओ (CTO) संजय कुमार यांनाही मीशो लिस्ट झाल्यावर मोठा फायदा होईल. संजय यांच्याकडे ३१.५७ कोटी शेअर्स आहेत. संजय यांनी हे शेअर्स केवळ ०.०२ रुपये प्रति शेअर च्या सरासरी किमतीवर, म्हणजेच एकूण ६३ लाख रुपये गुंतवून खरेदी केले होते. प्राइस बँडच्या उच्चांकी स्तरावर संजय यांच्या होल्डिंगचे मूल्य ३५०४ कोटी रुपयांपर्यंत पोहोचतं.
(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)
