जगप्रसिद्ध बेस्टसेलर पुस्तक 'रिच डॅड पुअर डॅड'चे लेखक आणि प्रसिद्ध आर्थिक सल्लागार रॉबर्ट कियोसाकी यांनी पुन्हा एकदा गुंतवणूकदारांना मोठा इशारा दिला आहे. कियोसाकी यांच्या मते, जगभरातील अर्थव्यवस्थेवर मोठे संकट कोसळण्याची शक्यता आहे आणि वाढत्या महागाईमुळे स्टॉक मार्केट लवकरच कोसळू शकते.
आपल्या या भाकिताच्या पार्श्वभूमीवर, कियोसाकी यांनी गुंतवणूकदारांना आपली मालमत्ता सुरक्षित ठेवण्यासाठी तातडीने तीन गोष्टींमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. या तीन गोष्टी म्हणजे सोने, चांदी, बिटकॉइनमध्ये त्यांनी गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. शिवाय त्यांनी आपण १९७१ पासून सोने खरेदी करत असल्याचे म्हटले आहे. आजही सोने खरेदी करतोय, विकत नाहीय, असेही ते म्हणाले.
कियोसाकी यांच्या मते, सध्या कागदी चलन आणि पारंपारिक गुंतवणूक साधने असुरक्षित झाली आहेत. याच्या उलट, सोने आणि चांदी यांसारख्या मौल्यवान धातूंमध्ये त्यांची किंमत टिकवून ठेवण्याची क्षमता आहे, कारण त्यांचा पुरवठा मर्यादित आहे. सोन्याची माझी लक्ष्य किंमत $२७ हजार आहे. माझ्याकडे चांदीच्या खाणी आहेत आणि मला माहित आहे की नवीन चांदी दुर्मिळ आहे. चांदीसाठी मी $१०० लक्ष्य ठेवले आहे.
बिटकॉइनला का महत्त्व?
यासोबतच, त्यांनी बिटकॉइनला महत्त्व दिले आहे. बिटकॉइन हे कोणत्याही केंद्रीय बँकेच्या नियंत्रणाखाली नाही आणि त्याची संख्याही मर्यादित आहे. त्यामुळे, अस्थिर आर्थिक काळात ते 'डिजिटल सोने' म्हणून मालमत्ता सुरक्षित ठेवू शकते, असा कियोसाकी यांचा विश्वास आहे. यापूर्वीही कियोसाकी यांनी अनेकदा आर्थिक संकटांबद्दल भविष्यवाणी केली आहे. त्यांच्या या ताज्या इशाऱ्यामुळे आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
