Raghuram Rajan : रुपयाचं मूल्य सातत्यानं घसरत आहे. मंगळवारी रुपया ८६.५८ रुपयांवर बंद झाला. दरम्यान, रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर आणि अर्थतज्ज्ञ रघुराम राजन यांनी रुपयाचं मूल्य आणखी घसरू शकतं असं मत व्यक्त केलं. डॉलरच्या तुलनेत जगातील बहुतांश चलनांचे अवमूल्यन होत असल्यानं रुपयाची घसरण रोखण्यासाठी रिझर्व्ह बँकेला चलन बाजारात हस्तक्षेप करण्याची गरज नाही, असंही ते म्हणाले. रुपयाची घसरण रोखण्यासाठी रिझर्व्ह बँकेने अलीकडच्या काळात अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक केली आहे.
स्वित्झर्लंडमधील दावोस येथे सुरू असलेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये रघुराम राजन सहभागी झाले होते. "गेल्या काही महिन्यांत अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपयाचे अवमूल्यन झालं आहे. पण अजूनही इतर चलनांच्या तुलनेत रुपया ओव्हरव्हॅल्युड आहे, त्यामुळे अजूनही घसरणीला वाव आहे," असं राजन म्हणाले. तुम्ही सर्व जण डॉलरच्या तुलनेत चलनांचं मूल्य घसरल्याबद्दल बोलत आहात, पण प्रत्येकजण भारताबद्दल विचारतो. डॉलरच्या तुलनेत रुपया ८५.६ वर आहे आणि प्रत्येक जण रुपयाचं अवमूल्यन का होत आहे, असा प्रश्न विचारत आहे. पण डॉलर आणि इतर चलनांमधील संबंध जाणून घेण्याची प्रत्येकाची इच्छा असते. अनेक मध्यवर्ती बँका आपल्या चलनांची घसरण रोखण्यासाठी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करीत आहेत, परंतु त्यांनी तसं करू नये असा सल्ला त्यांनी दिला.
कपातीचा अपेक्षित परिणाम नाही
फेडरल रिझर्व्हने नुकतीच व्याजदरात कपात केली असली तरी त्याचा अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर अपेक्षित परिणाम झालेला नाही. यामुळेच उदयोन्मुख बाजारपेठा वित्तीय बाजारातील घडामोडींमुळे नाराज आहेत. अमेरिकन डॉलर हे जगातील सर्वोच्च चलन असलं तरी अलीकडच्या काही वर्षांत त्याचा शस्त्र म्हणून वापर केला जात असून अनेक देशांना त्याची भीती वाटते. "उत्तर अमेरिका-युरो ब्लॉकबाहेरील अनेक मध्यवर्ती बँकर्स त्यांच्या चलनांच्या वेपनायझेशनबद्दल साशंक आहेत. जगातील सर्वात स्थिर आणि लिक्विड मार्केटमध्ये आपल्याला वगळण्याची आणि भरमसाठ दंड आकारण्याची शक्ती किती प्रमाणात आहे," असंही त्यांनी नमूद केलं.