Rapido Driver Earnings : आजच्या काळात चांगले उत्पन्न मिळवण्यासाठी मोठ्या पगाराची नोकरी किंवा व्यवसायाच हवा, असे अनेकांकडून ऐकलं असेल. पण मेहनतीच्या जोरावर कोणीही यशाचे शिखर गाठू शकते, हे एका रॅपिडो चालकाने सिद्ध केले आहे. एका कॉपीरायटर महिलेने लिंक्डइनवर शेअर केलेल्या पोस्टमुळे ही कहाणी सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली आहे.
कोमल पोरवाल नावाच्या महिलेने सांगितले की, एका रात्री त्या रॅपिडो राईडने प्रवास करत होत्या, तेव्हा त्यांची ड्रायव्हरसोबत चर्चा झाली. या बोलण्यातून कोमल यांना एक प्रेरणादायी सत्य समजले.
कमाईचे अनेक मार्ग
ड्रायव्हर अत्यंत उत्साही आणि मनमिळाऊ होता. प्रवासादरम्यान कोमल यांनी त्याला विचारले, "भैया, तुम्ही फुल टाइम हेच काम करता का?" यावर त्या ड्रायव्हरने आपल्या कमाईच्या अनेक पद्धती सांगितल्या.
- तो सकाळी स्विगी डिलिव्हरी पार्टनर म्हणून काम करतो.
- संध्याकाळच्या वेळेत तो रॅपिडोसाठी बाईक चालवतो.
- शनिवार आणि रविवारच्या दिवशी तो आपल्या भावासोबत एक स्थानिक स्ट्रीट फूड स्टॉल (पाणीपुरीचा ठेला) चालवतो.
- म्हणजेच, आपल्या कुटुंबाला आनंदाने ठेवण्यासाठी आणि जीवन आरामशीर जगता यावे यासाठी तो दिवस-रात्र विविध कामे करून पैसे कमावतो.
मेहनतीच्या जोरावर १ लाख रुपयांची कमाई
ड्रायव्हरची ही गोष्ट ऐकून कोमल पोरवाल आश्चर्यचकित झाल्या. तेव्हा ड्रायव्हरने हसत सांगितले, "बस मॅम, थोडी मेहनत जास्त आहे, पण घर आनंदाने चालले आहे." उत्पन्नाचे अनेक मार्ग वापरून तो तरुण महिन्याला जवळपास १ लाख रुपये कमावत होता.
वाचा - सिबिल स्कोअर कमी आहे? काळजी करू नका! 'या' ५ मार्गांनी तुम्हाला कमी स्कोअरवरही मिळू शकते कर्ज
सोशल मीडियावर सकारात्मक प्रतिक्रिया
या पोस्टवर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सकारात्मक प्रतिक्रिया उमटल्या आहेत.
एका युजरने लिहिले की "जेव्हा आपण कम्फर्ट झोनमधून बाहेर पडतो, तेव्हा अशा अनेक प्रेरणादायी कथा ऐकायला मिळतात."
दुसऱ्या युजरने मत मांडले, "जो माणूस सकारात्मक आणि आनंदी असतो, तो जास्त कमावतो आणि आयुष्य मोकळेपणाने जगतो. तर जो सतत पैशांच्या मागे धावतो, तो तणावात राहतो आणि व्यसनाच्या आहारी जातो, ज्यामुळे त्याची आर्थिक आणि मानसिक स्थिती सुधारत नाही."
