शेअर बाजारात मंगळवारीही घसरण दिसून आली. असं असतानाही व्हीएसटी इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्ये चांगली वाढ होताना दिसत आहे. व्हीएसटी इंडस्ट्रीजचे शेअर्स मंगळवारी 3% पेक्षा अधिक वाढून 3816 रुपयांवर पोहोचले. दिग्गज गुंतवणूकदार राधाकिशन दमानी यांनी व्हीएसटी इंडस्ट्रीजचे आणखी शेअर्स खरेदी केले आहेत. दमानी यांनी व्हीएसटी इंडस्ट्रीजचे 2.33 लाख शेअर्स किंवा कंपनीतील 1.51% हिस्सा खरेदी केलाय. दमानी यांनी व्हीएसटी इंडस्ट्रीजचे शेअर्स 3689.96 रुपये प्रति शेअर या दराने खरेदी केलेत.
कंपनीत ३४.४ टक्के हिस्सा
राधाकिशन दमानी यांची डिसेंबर 2023 च्या तिमाहीत व्हीएसटी इंडस्ट्रीजमध्ये 32.89% भागीदारी होती. दमानी यांनी आता कंपनीचे 2.33 लाख शेअर्स 86.25 कोटी रुपयांना विकत घेतलेत. व्हीएसटी इंडस्ट्रीजमधील त्यांचा हिस्सा आता 34.4% झाला आहे. या वर्षी जानेवारीमध्ये, दमानी यांनी व्हीएसटी इंडस्ट्रीजमध्ये 1.44% स्टेक विकत घेतला होता, त्यानंतर कंपनीतील त्यांच्या स्टेकने 30% पातळी ओलांडली होती आणि ते कंपनीचे सर्वात मोठे शेअरहोल्डर बनले होते, कारण व्हीएसटी इंडस्ट्रीजमध्ये प्रवर्तकांचा हिस्सा 32.16% होती.
1800 टक्क्यांपेक्षा अधिक रिटर्न
कंपनीच्या शेअर्सनी गेल्या काही वर्षात 1800% पेक्षा जास्त परतावा दिला आहे. 8 एप्रिल 2004 रोजी कंपनीचे शेअर्स 197.65 रुपयांवर होते. 16 एप्रिल 2024 रोजी व्हीएसटी इंडस्ट्रीजचे शेअर्स 3816 रुपयांवर पोहोचले आहेत. कंपनीच्या समभागांची 52 आठवड्यांची उच्चांकी पातळी 4328.45 रुपये आहे. त्याच वेळी, कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांकी पातळी 3159.90 रुपये आहे. गेल्या एका वर्षात व्हीएसटी इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्ये सुमारे 15 टक्क्यांची वाढ झाली आहे.
एचडीएफसी म्युच्युअल फंडानं व्हीएसटी इंडस्ट्रीजचे 3.3 लाख शेअर्स विकले आहेत. एचडीएफसी म्युच्युअल फंडानं कंपनीतील आपला 2.15% हिस्सा विकला. एचडीएफसी म्युच्युअल फंडानं डिसेंबर 2023 च्या तिमाहीत कंपनीमध्ये 5.84% हिस्सा घेतला होता.
(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)