whatsapp hacking : तुम्ही फोन लावल्यानंतर सायबर गुन्ह्यांची माहिती देणारी सूचना नक्कीच ऐकली असेल. सोशल मीडियावर याची खिल्लीही उडवण्यात आली. कदाचित तुम्हालाही कटकट वाटत असेल तर थांबा. कारण, आजकाल सायबर गुन्हेगारीचे प्रमाण खूप वाढले आहे. अनेक लोक वेगवेगळ्या प्रकारे सायबर गुन्ह्यांचे बळी ठरत आहेत. हॅकर्स लोकांचे अकाउंट हॅक करुन संवेदनशील माहिती चोरत आहेत. याचा गैरवापर करुन पैसे उकळत आहेत. इतकच काय व्हॉट्सअपसारखी सुरक्षित सोशल मीडिया अॅप्सही हॅक केली जात आहे. अशाच एका घटनेत पुण्यातील एका तरुणाचा जवळपास महिन्याभरापासून मानसिक छळ सुरू आहे.
नेमकी कशी घडली घटना?
साधारण महिन्याभरापूर्वी सुधीर (नाव बदलेलं) याच्या मोबाईलवर एक अज्ञात क्रमांकावरुन फोन आला. तंत्रज्ञानाची चांगली समज असलेल्या सुधीरला ही संशयास्पद गोष्ट लगेच लक्षात आली. मात्र, जिज्ञासेपोटी नेमकं काय होतंय म्हणून त्याने तो कॉल घेतला आणि तिथेच घोळ झाला. तो दिवस पुढे काहीच घडले नाही. दुसऱ्या दिवशी आपलं व्हॉट्सअप आणखी कुठेतरी सुरू असल्याचे त्याच्या लक्षात आलं. त्यानंतर काहीच वेळात व्हॉट्सअपवर त्याला एक कॉल आला. तुझ्या संपूर्ण फोनचा एक्सेस आमच्याकडे असून तुला तो परत हवा असेल तर ५ लाख देण्याची मागणी केली. याला सुधीरने नकार दिल्यानंतर अज्ञात व्यक्तीने त्याला शिवीगाळ केली. यावर सुधीरनेही त्याला प्रत्युत्तरात शिवीगाळ केली.
कॉन्टॅक्टमधील महिलांना कॉल करुन धमकी
त्यानंतर लगेचच त्याच्या फोनमधून संपूर्ण कॉन्टॅक्ट लिस्ट डिलीट करण्यात आली. लिस्टमधील महिलांना फोन करुन पैशांची मागणी करण्यात येऊ लागली. महिलांना अश्लिल शिवीगाळ झाली. इकडे या गोष्टीचा सुधीरला काहीच तपास नव्हता. मात्र, नातेवाईकांनी सुधीरला तुझ्या फोन नंबरवरुन आम्हाला शिवीगाळ आणि धमक्या येत असल्याचे सांगितले. लागलीच सुधीरने सायबर पोलिसांकडे याची तक्रार केली. पोलिसांनी संबंधित नंबर ब्लॉक करण्याचा सल्ला दिला. मात्र, त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावरुन धमक्या देण्यात आल्या. दरम्यान, सुधीरने फोन काही दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला.
सायबर गुन्हेगारांनी दिले ३ पर्याय
फोन बंद ठेवूनही सुधीरच्या डोक्याचा ताप कमी झाला नाही. कारण, त्यांची फोनमधील संपूर्ण लिस्ट सायबर गुन्हेगारांकडे आहे. त्यावरुन ते सातत्याने लिस्टमधील महिलांना फोन कॉल्स आणि मॅसेज करुन त्रास देत आहेत. हॅकर्सनी तरुणाला ३ स्टेप सांगितल्या आहेत. पहिली म्हणजे तुझी प्रचंड बदनामी केली जाईल. दुसऱ्यात सुधीरने दिलेल्या शिव्या तुझ्या कॉन्टॅक्ट लिस्टमधील सर्व महिलांचा व्हॉट्सअप ग्रुप तयार करुन त्यावर पाठवल्या जातील. सोबत अश्लिल व्हिडीओही पाठवणार. तिसऱ्यात या अश्लिल क्लिपमध्ये तुझेही व्हिडीओ तयार करुन टाकले जाणार आहे. हे सर्व थांबवायचं असेल तर ५ लाख रुपयांची मागणी करण्यात आली आहे. या सर्व प्रकाराने तरुण आणि त्याच्या कुटुंबियांना मानसिक धक्का बसला आहे. जवळपास महिन्याभरापासून या तरुणाचा अशा प्रकारे छळ सुरू असल्याने तो सध्या दहशतीत आहे. सध्या या प्रकरणाचा पोलीस तपास करत आहेत.
काय काळजी घ्यावी?
टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन : जवळपास सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मने ही सुविधा आणली आहे. नेहमी टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन सुरू ठेवा. त्यामुळे सिक्योरिटी वाढते.
रजिस्ट्रेशन कोड : व्हॉट्सअॅप जेव्हा सुरू असते तेव्हा लिंक्ड डिव्हाईससाठी रजिस्ट्रेशन कोड येतो. तुमच्याकडून कोणी हा रजिस्ट्रेशन कोड मिळवला तर तुमच्या व्हॉट्सअॅपच्या संपूर्ण अॅक्सेस त्याला मिळेल. हा रजिस्ट्रेशन कोड कधी कोणाला शेअर करु नका.
अज्ञात लिंक : व्हॉट्सअॅप हॅक होण्याचे आणखी एक मोठे कारण आहे. तुम्हाला जर मेसेज किंवा ईमेलच्या माध्यमातून लिंक मिळाली, तुम्ही चुकीने त्या लिंकला क्लिक केले तर तुमचा फोन हॅक होऊ शकतो. कोणाकडे तुमच्या फोनचा अॅक्सेस गेल्यावर व्हॉट्सअॅप सहज हॅक होऊ शकतो.