Prime Focus Share : जागतिक राजकीय तणावामुळे शेअर बाजारात सध्या अस्थिरतेचे वातावरण असताना, एका कंपनीच्या शेअरने मात्र गुंतवणूकदारांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. व्हीएफएक्स आणि पोस्ट प्रॉडक्शन क्षेत्रातील दिग्गज कंपनी 'प्राईम फोकस' सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. बॉलीवूडचा सुपरस्टार रणबीर कपूरच्या आगामी 'रामायण' चित्रपटाचे व्हिज्युअल इफेक्ट्स ही कंपनी सांभाळत असून, या बातमीने कंपनीच्या शेअरमध्ये 'रॉकेट' गतीने वाढ झाली आहे.
टीझरनंतर शेअरमध्ये १०६ टक्क्यांची उसळी
- गेल्या काही महिन्यांपासून प्राईम फोकसच्या शेअरमध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे.
- पहिला टीझर (जुलै २०२५): त्यावेळी शेअरची किंमत सुमारे १६० रुपयांच्या आसपास होती.
- दुसरा टीझर (२ एप्रिल २०२६): या दुसऱ्या टीझरनंतर शेअरने थेट ३३० रुपयांचा टप्पा ओलांडला. म्हणजेच केवळ काही महिन्यांत गुंतवणूकदारांना १०६% परतावा मिळाला आहे.
- वार्षिक कामगिरी: गेल्या एक वर्षाचा विचार केल्यास, या शेअरने २६२% मल्टीबॅगर परतावा देऊन गुंतवणूकदारांच्या खिशात मोठी भर घातली आहे.
५२ आठवड्यांच्या उच्चांकावर मजल
आजच्या सत्रातही या शेअरमध्ये मोठी खरेदी दिसून आली. शेअरने ३५०.९० रुपयांच्या आपल्या ५२ आठवड्यांच्या उच्चांकाला स्पर्श केला असून, सध्या तो ३४६.८० रुपयांच्या पातळीवर व्यवहार करत आहे. कंपनीचे एकूण बाजार भांडवल आता २७,०१२ कोटी रुपयांवर पोहोचले आहे.
रणबीर कपूरसह मोठ्या दिग्गजांची गुंतवणूक?
- या शेअरमधील तेजीमागे केवळ चित्रपटाची चर्चा नसून, त्यात झालेली मोठी गुंतवणूक हे देखील प्रमुख कारण आहे.
- रणबीर कपूर: 'रामायण' मध्ये प्रभू श्रीरामाची भूमिका साकारणारा रणबीर कपूर स्वतः या कंपनीचा भागधारक होणार आहे. कंपनीच्या प्रेफरेंशियल इश्यूमध्ये रणबीर १२.५ लाख शेअर्स घेणार असल्याची माहिती समोर आली आहे.
- इतर दिग्गज: या गुंतवणुकीमध्ये रिलायन्सचे आकाश अंबानी आणि प्रसिद्ध गुंतवणूकदार नमित मल्होत्रा यांचीही नावे चर्चेत असल्याने गुंतवणूकदारांचा विश्वास अधिक दृढ झाला आहे.
वाचा - गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. शेअर बाजारातील गुंतवणूक जोखमीच्या अधीन असते. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)
