जागतिक अर्थव्यवस्थेत स्वतःचे स्थान बळकट करण्यासाठी पोलंडच्या मध्यवर्ती बँकेने एक मोठी खेळी खेळली आहे. फेब्रुवारी महिन्यात पोलंडने तब्बल २० टन सोन्याची खरेदी केली असून, यामुळे पोलंडचा एकूण सुवर्णसाठा आता भारताच्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या साठ्याला टक्कर देण्याच्या पातळीवर आला आहे.
नॅशनल बँक ऑफ पोलंडने गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने सोन्याची खरेदी वाढवली आहे. जागतिक सुवर्ण बाजारात सध्या पोलंडच्या मध्यवर्ती बँकेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. फेब्रुवारी महिन्यात जगभरात झालेल्या एकूण २७ टन सोने खरेदीमध्ये एकट्या पोलंडचा वाटा तब्बल २० टन इतका आहे. फेब्रुवारी २०२५ नंतरची ही पोलंडची एका महिन्यातील सर्वात मोठी सुवर्ण खरेदी ठरली आहे.
मागील वर्षाची तुलना
गेल्या वर्षी (फेब्रुवारी २०२५) पोलंडने २९ टन सोने खरेदी केले होते. पोलंड ज्या वेगाने सोने खरेदी करत आहे, त्यावरून ते आपल्या अर्थव्यवस्थेला जागतिक चलनांच्या चढ-उतारांपासून सुरक्षित करण्यासाठी सुवर्ण साठ्यावर अधिक भर देत असल्याचे स्पष्ट होत आहे.
पोलंडच्या सुवर्ण साठ्यातील महत्त्वाची आकडेवारी:
फेब्रुवारी २०२६ मधील खरेदी: २० टन.
एकूण सुवर्ण साठा: ५७० टन.
फॉरेक्स रिझर्व्हमधील वाटा: पोलंडच्या एकूण विदेशी मुद्रा साठ्यापैकी (Forex Reserve) आता ३१% हिस्सा हा केवळ सोन्याच्या स्वरूपात आहे.
लक्ष्य (Target): पोलंडने ७०० टन सोन्याचा साठा जमा करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवले आहे.
सोन्याची खरेदी का वाढवली?
१. आर्थिक सुरक्षा: जागतिक अनिश्चितता आणि भू-राजकीय तणावामुळे चलनाचे मूल्य कमी होण्याचा धोका असतो. अशा वेळी सोने हा सर्वांत सुरक्षित पर्याय मानला जातो.
२. चलन साठ्याचे वैविध्य: डॉलरवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी आणि आपल्या विदेशी मुद्रा साठ्याला स्थिरता देण्यासाठी पोलंडने ही रणनीती अवलंबली आहे.
आरबीआय आणि पोलंडची तुलना
भारताची मध्यवर्ती बँक 'रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया' देखील सातत्याने आपला सुवर्ण साठा वाढवत आहे. सप्टेंबर २०२५ अखेरपर्यंत भारताचा एकूण सुवर्ण साठा ८८० टन इतका होता. पोलंड सध्या ५७० टनांवर असला तरी, ७०० टनांच्या लक्ष्यामुळे ते जगातील प्रमुख सुवर्ण साठा असलेल्या देशांच्या यादीत वेगाने वर सरकत आहेत.
