Piyush Pandey Death: भारतीय जाहिरात उद्योगातील एक सुप्रसिद्ध नाव असलेले मार्केटिंग गुरू पीयूष पांडे यांचं गुरुवारी निधन झालं. त्यांनी जाहिरात विश्वात नवे रंग भरले आणि त्यांची अनेक कॅम्पेन्सही खूप गाजली. त्यामुळेच ते घराघरांमध्ये ब्रँड्सची ओळख बनले. त्यांनी एशियन पेंट्स साठी 'हर खुशी में रंग लाए' हा कॅम्पेंन स्लोगन लिहिला होता. याव्यतिरिक्त, कॅडबरीची ॲड 'कुछ खास है' देखील त्यांच्या लेखणीतून साकारली होती. २०१६ मध्ये त्यांचा पद्मश्री पुरस्कारानं गौरवही करण्यात आला होता.
भारताच्या विविधतेतील एकात्मता दर्शवणाऱ्या 'मिले सुर मेरा तुम्हारा' या गीताचेही लेखक तेच होते. हे गाणं तर दूरदर्शनचं थीम साँग बनलं होतं. नंतर इंटरनेटचा प्रसार झाल्यावर लोक यूट्यूब आणि इतर माध्यमांवर जाऊन अजूनही हे गाणं ऐकत आहेत. त्यांनी 'फेविकोल', 'हच' यांसारख्या कंपन्यांसाठीही अनेक यशस्वी ॲड कॅम्पेन्सचं नेतृत्व केलं होतं.
'अबकी बार, मोदी सरकार'ही त्यांच्याच कल्पनेतून
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या प्रचाराचा 'अबकी बार, मोदी सरकार' हा नाराही त्यांच्याच कल्पनेतून आला होता. पीयूष पांडे भारतीय जाहिरात इंडस्ट्रीत मोठे बदल घडवून आणण्यासाठी ओळखले जातात. त्यांनी प्रसिद्ध ॲड कंपनी 'ओगिल्वी इंडिया'सोबत जवळपास ४ दशकांपर्यंत काम केलं. या कंपनीत पीयूष पांडे यांची महत्त्वपूर्ण भूमिका होती. त्यांच्या निधनासोबतच जाहिरात विश्वातील एका युगाचा अंत झाला आहे. त्यांचा हसमुख चेहरा नेहमी लक्षात राहील.
त्यांच्या जाहिरातींची चर्चा
त्यांना भारतीय समाज, भाषा आणि परंपरांची खूप सखोल समज होती. याच कारणामुळे त्यांचे अनेक कॅम्पेन्स लोकांच्या मनाला भिडले. प्रोडक्ट लोकप्रिय झालेच, पण त्यांनी बनवलेल्या जाहिरातींचीही खूप चर्चा झाली आणि लोक मोठ्या उत्साहानं त्या पाहत होते. पीयूष पांडे यांनी १९८२ मध्ये ओगिल्वी इंडिया सोबत जोडले गेले. त्यापूर्वी ते एक क्रिकेटपटू होते. याव्यतिरिक्त त्यांनी चहाच्या बागेतही काम केलं होतं आणि बांधकाम क्षेत्रातही काम केलं. त्यांनी २७ वर्षांच्या वयात या इंडस्ट्रीत प्रवेश केला आणि इंग्रजी भाषेचं प्रभुत्व असलेल्या जाहिरात विश्वाचा चेहरामोहराच बदलून टाकला. त्यांनी एशियन पेंट्स, कॅडबरी सह अनेक कंपन्यांच्या कॅम्पेशन्सना नवी उंची मिळवून दिली होती.
पीयूष पांडे यांच्या काही अविस्मरणीय जाहिराती:
- फेविक्विक आणि फेविकॉलच्या उत्कृष्ट जाहिराती त्यांनी केल्या. 'तोडो नही, जोडो' सारखी टॅगलाईन त्यांनी दिली
- गुगली वूगली वूश!! – पॉन्ड्स (Googly Woogly Woosh!! – Ponds)
- कॅडबरी डेअरी मिल्क – 'कुछ खास है' (Kuch Khaas Hai)
- वोडाफोन – झूझू (ZooZoo)
- एशियन पेंट्स – 'हर घर कुछ कहता है' (Har Ghar Kuch Kehta Hai)
- बजाज – 'हमारा बजाज' (Hamara Bajaj)
- एअरटेल – 'हर एक फ्रेंड जरुरी होता है' (Har Ek Friend Zaroori Hota Hai)
- राजकीय जाहिरात, जसं की भाजपची २०१४ ची मोहीम ज्यात 'अबकी बार मोदी सरकार' ही टॅगलाइन होती.
- याशिवाय पोलिओ अभियानासाठी (Polio Abhiyaan) अमिताभ बच्चन यांच्यासारख्या सेलिब्रिटींसोबतही त्यांनी काम केलं होते.
