IndiGo vs Air India : भारतीय विमान वाहतूक क्षेत्र सध्या एका अभूतपूर्व संकटातून जात आहे. एकीकडे प्रवाशांची संख्या वाढत असताना, दुसरीकडे अनुभवी वैमानिकांच्या कमतरतेमुळे इंडिगो आणि एअर इंडिया या दोन दिग्गज कंपन्यांमध्ये 'रस्सीखेच' सुरू झाली आहे. परिस्थिती इतकी गंभीर आहे की, प्रतिस्पर्धी कंपनीच्या अनुभवी कॅप्टन्सना आपल्याकडे खेचण्यासाठी एअरलाईन्स चक्क ५० लाख रुपयांपर्यंतच्या 'जॉइनिंग बोनस'ची ऑफर देत आहेत.
५० लाखांचा 'जॅकपॉट' आणि सॅलरी वाढ
विमान वाहतूक उद्योगातील सूत्रांनुसार, वैमानिकांना आपल्या ताफ्यात सामील करण्यासाठी कंपन्यांनी तिजोरी उघडली आहे. पूर्वी हा बोनस १५ ते २५ लाखांच्या घरात होता, जो आता थेट ५० लाखांवर पोहोचला आहे. जुन्या कंपनीचा 'बॉण्ड' फेडण्यासाठी ही रक्कम दिली जात आहे. इंडिगोने पुढच्या महिन्यापासून भत्त्यांमध्ये वाढ करून पगार वाढवण्याची घोषणा केली आहे. तर एअर इंडिया जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात वैमानिकांसाठी एक 'मोठी पॉलिसी' जाहीर करणार आहे.
'FDTL' चे नवीन नियम अन् तुटवडा
डीजीसीएने वैमानिकांचा थकवा कमी करण्यासाठी आणि सुरक्षेसाठी 'फ्लाईट ड्युटी टाइम लिमिटेशन' नियम कडक केले आहेत. नवीन नियमांनुसार, एकाच फ्लाईट शेड्यूलिंगसाठी आता पूर्वीपेक्षा जास्त वैमानिकांची गरज भासत आहे. इंडिगोने जानेवारी महिन्यातच १०० नवीन वैमानिकांची भरती करण्याचे आश्वासन दिले आहे, जेणेकरून विमानांच्या फेऱ्या रद्द होण्याची नामुष्की टाळता येईल.
भारतीय वैमानिकांचे परदेशात 'पलायन'
भारतीय वैमानिक केवळ देशांतर्गतच नाही, तर व्हिएतनाम आणि आखाती देशांमधील एअरलाईन्सकडे आकर्षित होत आहेत. तिथे मिळणारे भरघोस वेतन आणि कामाच्या चांगल्या सुविधांमुळे भारतीय टॅलेंट परदेशात जात आहे. माजी कॅप्टन शक्ती लुंबा यांच्या मते, जर भारतातील कामाच्या स्थितीत सुधारणा झाली नाही, तर हे पलायन रोखणे कठीण होईल.
वाचा - मंदीच्या बाजारात 'या' शेअरची धूम! ३१०० टक्के परतावा देणाऱ्या कंपनीने केली बोनसची घोषणा
एअर इंडियाची दूरदृष्टी
एअर इंडिया आपल्या भविष्यातील विस्तार योजना लक्षात घेऊन मोठ्या प्रमाणावर भरती करत आहे. सध्या इंडिगो ज्या ऑपरेशनल संकटाचा सामना करत आहे, तशी वेळ भविष्यात येऊ नये यासाठी एअर इंडियाने आत्तापासूनच अनुभवी कॅप्टन्सना आपल्या ताफ्यात घेण्याचा सपाटा लावला आहे.
