Dividend Stock : आयटी क्षेत्रातील प्रमुख कंपनी ओरॅकल फायनान्शियल सर्व्हिसेस सॉफ्टवेअरने आपल्या भागधारकांसाठी मोठी घोषणा केली आहे. कंपनीने आर्थिक वर्ष २०२६ साठी प्रति शेअर १३० रुपयांचा अंतरिम लाभांश देण्याचा निर्णय घेतला आहे. हा लाभांश जाहीर करतानाच कंपनीने तिमाही निकालही सादर केले आहेत. गुंतवणूकदारांसाठी ही मोठी बातमी असून, कंपनीने लाभांश वितरणाची तारीखही निश्चित केली आहे.
लाभांश मिळवण्यासाठी 'ही' तारीख महत्त्वाची
कंपनीने लाभांशासाठी ३ नोव्हेंबर २०२५ ही तारीख रेकॉर्ड डेट म्हणून निश्चित केली आहे. ३ नोव्हेंबर २०२५ पर्यंत ज्या भागधारकांची नावे कंपनीच्या रजिस्टर ऑफ मेंबर्स किंवा डिपॉझिटरीजच्या नोंदीमध्ये लाभार्थी मालक म्हणून नोंदवली जातील, ते सर्वजण या लाभांशासाठी पात्र असतील. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, हा लाभांश भागधारकांना १५ नोव्हेंबर २०२५ रोजी किंवा त्यापूर्वी वितरित केला जाईल. कंपनीने आर्थिक वर्ष २०२५ साठी प्रति शेअर २६५ रुपयांचा अंतरिम लाभांश दिला होता, हे विशेष. ओरॅकल फायनान्शियल सर्व्हिसेस सॉफ्टवेअरच्या शेअरची दर्शनी किंमत ५ रुपये आहे.
कंपनीची आर्थिक स्थिती कशी आहे?
कंपनीचा एकत्रित निव्वळ नफा वार्षिक आधारावर ५.४ टक्क्यांनी घसरून ५४६.१० कोटी रुपयांवर आला. (मागील वर्षी याच तिमाहीत तो ५७७.७० कोटी रुपये होता.) ऑपरेशन्सपासून मिळालेला एकत्रित महसूल वार्षिक आधारावर ७ टक्क्यांनी वाढून १,७८८.८० कोटी रुपये झाला. (मागील वर्षी याच तिमाहीत तो १,६७३.९० कोटी रुपये होता.)
शेअरची स्थिती
ओरॅकल फायनान्शियल सर्व्हिसेस सॉफ्टवेअरचे बाजार भांडवल ७४,४०० कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. कंपनीचा शेअर शुक्रवार, २४ ऑक्टोबर रोजी बीएसई (BSE) वर ८५६३.९० रुपयांवर बंद झाला. गेल्या २ वर्षांत हा शेअर ११८ टक्क्यांनी वधारला आहे, परंतु २०२५ या वर्षात तो आत्तापर्यंत ३२ टक्क्यांनी घसरला आहे. सप्टेंबर २०२५ च्या अखेरीस कंपनीत प्रवर्तकांचा वाटा ७२.५३ टक्के होता. गुंतवणूकदारांसाठी हा १३० रुपयांचा लाभांश म्हणजे दिवाळीत एक मोठी भेट मानली जात आहे.
