Ruoming Pang AI : एकीकडे आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे लाखो कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जात आहेत. तर दुसरीकडे आर्टिफिशियल इंटेलिजन्स येतंय म्हणून टेक कंपन्या कोट्यवधी रुपयांच्या ऑफर्स देत आहेत. आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या जागतिक युद्धात सध्या कंपन्यांकडे किती पैसा आहे, यापेक्षा त्यांच्याकडे कोणते 'डोके' काम करतेय, याला अधिक महत्त्व आले आहे. सिलिकॉन व्हॅलीतील 'सुपरस्टार' शास्त्रज्ञ रुओमिंग पँग यांना आपल्या गोटात खेचण्यासाठी टेक विश्वातील दिग्गजांमध्ये अक्षरशः जुंपली होती. अखेर सॅम ऑल्टमॅन यांच्या 'ओपनएआय'ने बाजी मारली असून, मार्क झुकरबर्गच्या 'मेटा'कडून पँगना हिसकावून घेतले आहे.
एका वर्षात तीन कंपन्यांचा प्रवास
रुओमिंग पँग यांची मागणी इतकी प्रचंड आहे की, गेल्या १२ महिन्यांत त्यांनी तिसऱ्यांदा आपली कंपनी बदलली आहे. सुरुवातीला ते अॅपलमध्ये एआय मॉडेल्स टीमचे प्रमुख म्हणून कार्यरत होते. जुलै २०२५ मध्ये मेटाने त्यांना सुमारे २०० दशलक्ष डॉलर्स (सुमारे १८०० कोटी रुपये) या विक्रमी पॅकेजवर आपल्याकडे खेचले होते. मात्र, मेटासोबतचे हे नाते सहा महिनेही टिकू शकले नाही. आता पँग ओपनएआयच्या टीममध्ये सामील झाले आहेत.
गुगलमधील ऐतिहासिक कारकीर्द
पँग यांनी त्यांच्या करिअरचा सर्वात मोठा काळ (२००६-२०१२) गुगलमध्ये व्यतीत केला. तिथे त्यांनी 'बिगटेबल इंडेक्स' सारख्या क्रांतिकारी प्रकल्पांवर काम केले. गुगलची जागतिक प्रमाणीकरण यंत्रणा 'Zanzibar' उभी करण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. गुगल ब्रेनमध्ये असताना त्यांनी विकसित केलेले 'बेबेफिश' हे डीप लर्निंग फ्रेमवर्क आजही गुगलच्या डेटा सेंटर्समध्ये मोठ्या प्रमाणावर वापरले जाते.
शिक्षण आणि तज्ज्ञता
पँग यांचा शैक्षणिक प्रवासही तितकाच प्रभावी आहे. शांघाय जियाओ टोंग विद्यापीठातून पदवी घेतल्यानंतर त्यांनी अमेरिकेच्या युनिव्हर्सिटी ऑफ सदर्न कॅलिफोर्नियामधून कॉम्प्युटर सायन्समध्ये पीएचडी पूर्ण केली. एआय इन्फ्रास्ट्रक्चरमधील त्यांची तज्ज्ञता हेच त्यांच्या या अफाट लोकप्रियतेचे आणि कोट्यवधींच्या पॅकेजचे मुख्य कारण आहे.
वाचा - AI मुळे कोणाच्या नोकऱ्या जाणार? इन्फोसिसचे नारायण मूर्ती यांनी स्पष्टच सांगितले, म्हणाले...
टेक जगतात चर्चा का?
भविष्यातील एआयचे संपूर्ण साम्राज्य ज्या पायाभूत सुविधांवर उभे राहणार आहे, त्यातील पँग हे 'मास्टर' मानले जातात. अॅपल, गुगल आणि मेटासारख्या कंपन्यांना त्यांना गमावणे परवडणारे नव्हते, मात्र 'ओपनएआय'ने त्यांना आपल्या बाजूला करून एआयच्या शर्यतीत मोठे यश मिळवले आहे.
