Lokmat Money > बिझनेस न्यूज > अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका

अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका

फोनची बहुतांश निर्मिती अॅपल भारतातच करणार? चीनवरील अवलंबित्व कमी करणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2025 13:58 IST2025-04-26T13:54:14+5:302025-04-26T13:58:24+5:30

फोनची बहुतांश निर्मिती अॅपल भारतातच करणार? चीनवरील अवलंबित्व कमी करणार

Only Made in India iPhones will be sold in the US market A big blow to China | अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका

अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका

राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं टैरिफ लागू झाल्यानंतर अमेरिका आणि चीन यांच्यात सुरु झालेलं व्यापार युद्ध शमण्याची चिन्हं नाहीत. दरम्यान आयफोन उत्पादक अॅपल आता चीनची चिंता वाढवण्याच्या तयारीत आहे. कंपनीनं पुढील वर्षापर्यंत अमेरिकन बाजारात विकले जाणाऱ्या आयफोनची भारतात बनवण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत.

गेल्या काही वर्षांपासून अॅपलभारतात उत्पादन केंद्र उभारण्यावर काम करीत आहे. उत्पादनही वेगानं वाढवत आहे, अॅपल सध्या भारतात फॉक्सकॉन आणि टाटा इलेक्ट्रॉनिक्ससह अनेक मॅन्युफॅक्चरर्ससोबत मिळून आयफोनचं उत्पादन करीत आहे. ट्रम्प यांच्या टॅरिफमुळे आणि चीनवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी कंपनीनं हालचाली सुरु केल्यात.

आयफोन निर्यातीत मोठी वाढ 

मार्च महिन्यात फॉक्सकॉननं १.३१ अब्ज डॉलरचे आयफोन निर्यात केले होते. ही कंपनीद्वारे एका महिन्यात केलेली सर्वांत मोठी निर्यात ठरली. टाटानंही मोठी झेप घेतली आहे. कंपनीच्या आयफोन निर्यातीत ६३ टक्क्यांनी वाढ झाली असून ती ६१२ दशलक्ष डॉलर्सवर पोहोचली आहे.

भारतच का महत्त्वाचा?

कमी जोखमीचा पर्याय

अॅपलला चौनवरील अवलंबित्व कमी करायचं आहे. भू-राजकीय तणाव, व्यापार वाद आणि कोविड साथ आदी अडचणींमुळे कंपनीला आता एकाच प्रदेशावर विसंबून राहणं जोखमीचं वाटत आहे.

उत्पादन खर्चात घट

भारतात चीनच्या तुलनेत कमी खर्चात मंजूर उपलब्ध आहेत. स्थानिक स्तरावर उत्पादन केल्यानं कंपनीला इलेक्ट्रॉनिक्सवरील आयात खर्च कमी करता येतो.

केंद्र सरकारचं प्रोत्साहन

भारत सरकारचे 'मेक इन इंडिया' आणि 'प्रॉडक्शन लिंक्ड इनिशिएटिव्ह' या योजना कंपनीला स्थानिक उत्पादन वाढवण्यासाठी आर्थिक सवलती देतात. याचा लाभ कंपनीला मिळू शकतो.

उत्पादन ६०% वाढलं

मार्च २०२४ ते मार्च २०२५ या १२ महिन्यांत अॅपलने भारतात २२ अब्ज डॉलर इतक्या मूल्याचे आयफोन तयार केले. गेल्या वर्षाच्या तुलनेत यामध्ये ६०% वाढ झाली आहे. या काळात अॅपलनं १७.४ अब्ज डॉलरचे आयफोन निर्यात केले. जगभरात विकल्या जाणाऱ्या प्रत्येक ५ पैकी १ आयफोन आता भारतात बनवला जातो. भारतात आयफोनचं उत्पादन मुख्यतः तामिळनाडू आणि कर्नाटकमधील युनिटमध्ये केलं जातं.

अमेरिकन बाजारासाठी लागणाऱ्या आयफोनचे उत्पादन अॅपल कंपनी भारतात लवकरच हलवू शकते. उत्पादक कंपनी फॉक्सकॉनचा बंगळुरू येथील प्लांट या महिन्याच्या शेवटी सुरू होऊ शकतो. या प्लांटची उत्पादन क्षमता वर्षाला सुमारे २ कोटी युनिट्स आयफोन इतकी असणार आहे.

Web Title: Only Made in India iPhones will be sold in the US market A big blow to China

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.