Online Food Delivery: आजच्या डिजिटल युगात Swiggy आणि Zomato सारख्या अॅप्सवरून जेवण मागवणे सामान्य झाले आहे. यावरून काही मिनिटांत घरपोच जेवण मिळते. मात्र, या सोयीमागे लपलेले अतिरिक्त शुल्क तुमच्या खिशाला मोठी कात्री लावत आहेत.
महिन्याला ₹९०० चा अतिरिक्त खर्च?
एका रिपोर्टनुसार, जर तुम्ही महिन्याला १२ वेळा ऑनलाइन फूड ऑर्डर करत असाल, तर तुमच्याकडून सुमारे ₹१८० प्लॅटफॉर्म फी आणि सुमारे ₹७२० डिलिव्हरी चार्ज, अशाप्रकारे एकूण ₹९०० चा अतिरिक्त खर्च आकारला जातो.
प्लॅटफॉर्म फीमध्ये मोठी वाढ
गेल्या तीन वर्षांत या ऑनलाईन फूड डिलिव्हरी अॅप्सनी प्लॅटफॉर्म फीमध्ये मोठी वाढ केली आहे. पूर्वी ₹२ असणारी फी आता थेट ₹१७-₹१८ (GST सहित) वर पोहोचली आहे. म्हणजेच, म्हणजेच या फीमध्ये सुमारे 9 पट वाढ झाली आहे. या अतिरिक्त खर्चामुळे तुमच्या खिशाला कात्री लागत आहे.
फूड डिलिव्हरी मार्केटमध्ये मोठी वाढ
ऑनलाइन फूड ऑर्डरिंगचा वापर झपाट्याने वाढत आहे. २०२३ मध्ये याची बाजारपेठ सुमारे ₹६९,००० कोटी होती, जी आता (चालू वर्षअखेर) ₹२.२५ लाख कोटींवर पोहोचली आहे. यावरून स्पष्ट होते की, ग्राहकांचे ऑनलाइन सेवांवर अवलंबित्व मोठ्या प्रमाणात वाढत आहे.
ऑनलाइन जेवण खरोखर महाग का पडते?
ऑनलाइन ऑर्डर करताना अनेकांना लक्षात येत नाही की, मेन्यू दर ऑफलाइनपेक्षा १०-१५% जास्त असतात. उदाहरण: ऑफलाइन ४ रोट्या ₹१०० ला मिळतात, तर त्याच ऑनलाइन ₹११०-₹११५ ला मिळतात. याशिवाय डिलिव्हरी चार्ज, प्लॅटफॉर्म फी आणि GST, हे सर्व मिळून अंतिम बिल वाढते.
ग्राहकांसाठी महत्त्वाची सूचना
ऑनलाइन फूड ऑर्डर करताना ऑर्डर करण्यापूर्वी अंतिम बिल तपासा, शक्य असल्यास रेस्टॉरंटमधून थेट खरेदी करा, ऑफर्स आणि डिस्काउंट नीट तपासा आणि वारंवार ऑर्डर केल्यास खर्च वाढतो याची जाणीव ठेवा. ऑनलाइन फूड डिलीवरी ही सोयीची असली तरी ती महागही ठरू शकते. छोट्या-छोट्या शुल्कामुळे महिन्याच्या शेवटी मोठी रक्कम खर्च होते. त्यामुळे, सोयीसोबतच खर्चाचाही विचार करणे गरजेचे आहे.
