अमेरिका- इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या भीषण युद्धामुळे संपूर्ण जगाचे टेन्शन वाढले आहे. या युद्धाचे थेट परिणाम जागतिक इंधन बाजारावर झाले असून, २०२२ नंतर पहिल्यांदाच कच्च्या तेलाच्या किमतींनी १०० डॉलर्सचा टप्पा ओलांडला आहे. कच्च्या तेलाच्या दरात झालेल्या वाढीमुळे अनेक देशांसमोर आर्थिक संकट उभे ठाकले असून, भारताचे शेजारी देश असलेल्या पाकिस्तान आणि बांगलादेशची परिस्थिती अत्यंत गंभीर झाली आहे.
आठवड्याच्या पहिल्याच दिवशी कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी उसळी पाहायला मिळाली. ब्रेंट क्रूड २५ टक्क्यांनी वाढून ११५ डॉलर्स प्रति बॅरलच्या पुढे गेले आहे. डब्लूटीआय क्रूड तेलाचा दरही २४ टक्के वाढून प्रति बॅरल ११२ डॉलर्सच्या वर गेला. मुर्बन क्रूड तेलाचा दर जवळजवळ १८ टक्के वाढून प्रति बॅरल १२० डॉलर्स झाला. तर, नैसर्गिक वायूच्या किमतींमध्येही ८ टक्के वाढ नोंदवली गेली. महत्त्वाचे म्हणजे, ३० जून २०२२ नंतर पहिल्यांदाच अमेरिकेतील 'वेस्ट टेक्सास इंटरमीडिएट' तेलाची किंमत १०६ डॉलर्सच्या वर गेली आहे.
तज्ज्ञांच्या मते, हे युद्ध केवळ सीमेपुरते मर्यादित राहिलेले नाही, तर तेल शुद्धीकरण कारखान्यांना लक्ष्य केले जात आहे. जगातील २० टक्के तेलाचा व्यापार ज्या 'होर्मुझ सामुद्रधुनी' मार्गे होतो, तो मार्ग इराणच्या नाकाबंदीमुळे बंद झाला आहे. त्यातच कुवेत आणि कतारसारख्या देशांनी तेल पुरवठा थांबवण्याची धमकी दिल्याने आगीत तेल ओतण्याचे काम झाले आहे. कच्च्या तेलाच्या किमती वाढल्याने बांगलादेशात इंधनाचा तुटवडा निर्माण झाला आहे. परिस्थिती इतकी बिकट आहे की, बांगलादेश सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या विक्रीसाठी रेशनिंग सिस्टम लागू केली आहे. आता तिथल्या नागरिकांना केवळ ठराविक प्रमाणातच इंधन मिळणार आहे. पाकिस्तानची आर्थिक स्थितीही या महागाईमुळे कोलमडण्याच्या मार्गावर आहे.
भारतासमोर महागाईचे संकट?
भारत आपल्या गरजेच्या ८५ टक्के कच्चे तेल आयात करतो. भारताने जरी आपल्याकडे पुरेसा साठा असल्याचा दावा केला असला, तरी जागतिक स्तरावर किमती वाढत राहिल्या तर त्याचे गंभीर परिणाम भारतीय बाजारपेठेवर होऊ शकतात. पेट्रोल-डिझेल महागल्यास वाहतूक खर्च वाढून जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढू शकतात. तेलासाठी भारताला परकीय चलन जास्त खर्च करावे लागेल, ज्यामुळे अर्थव्यवस्थेवर ताण येईल. सध्या तरी भारत सरकार परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहे. मात्र, मध्य पूर्वेतील तणाव कमी न झाल्यास सर्वसामान्यांच्या खिशाला मोठी कात्री लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.
