Stock Split News: मल्टीबॅगर स्टॉक असलेल्या नुवामा वेल्थ मॅनेजमेंटचे (Nuvama Wealth Management) शेअर्स काही ॲप्सवर ८० टक्क्यांनी स्वस्त दिसत आहेत. यामागील मुख्य कारण म्हणजे कंपनीने केलेलं शेअर्सचं विभाजन हे आहे. आज हे शेअर्स 'एक्स-स्प्लिट' व्यवहार करत असून कंपनीच्या एका शेअरचे पाच भागांत विभाजन करण्यात आलं आहे. या स्टॉक स्प्लिटसाठी कंपनीनं २६ डिसेंबर २०२५ ही तारीख 'रेकॉर्ड डेट' म्हणून निश्चित केली होती.
शेअर्सचे पाच भागांत विभाजन
कंपनीनं एक्सचेंजला दिलेल्या माहितीनुसार, १० रुपये फेस व्हॅल्यू असलेल्या एका शेअरचे ५ भागांत विभाजन करण्यात आलं आहे. या विभाजनानंतर कंपनीच्या शेअरची फेस व्हॅल्यू आता प्रति शेअर २ रुपये झाली आहे. गुरुवारी हा शेअर ७,६१३.३५ रुपयांच्या पातळीवर बंद झाला होता. आज ८० टक्क्यांच्या तांत्रिक घसरणीनंतर हा शेअर १,५२२.६५ रुपयांच्या पातळीवर उघडला. व्यवहारादरम्यान या शेअरमध्ये सुमारे २ टक्क्यांची आणखी घसरण होऊन तो १,४९१.२५ रुपयांच्या पातळीवर आला होता.
Ola Electric ला सरकारकडून मिळणार ३६६.७८ कोटी रुपयांचा मोठा दिलासा; शेअरमध्ये जोरदार तेजी, जाणून घ्या
परतावा आणि गुंतवणुकीचा कल
गेल्या तीन महिन्यांत या शेअर्समध्ये २२ टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आहे, तर याच काळात सेन्सेक्स निर्देशांक ५.८९ टक्क्यांनी वधारला आहे. एका वर्षाचा विचार केल्यास या स्टॉकमध्ये ९.४८ टक्क्यांची वाढ झाली असून, दोन वर्षांत कंपनीच्या शेअर्सच्या भावात १०५ टक्क्यांची मोठी तेजी दिसून आली आहे. सप्टेंबर तिमाहीच्या आकडेवारीनुसार, कंपनीत प्रवर्तकांचा हिस्सा ५४.६५ टक्के आहे, तर सार्वजनिक गुंतवणूकदारांकडे ४५.३५ टक्के हिस्सा आहे.
सातत्यपूर्ण लाभांश देणारी कंपनी
नुवामा वेल्थ मॅनेजमेंट गुंतवणूकदारांना सातत्यानं लाभांश देत आहे. याच वर्षी नोव्हेंबर महिन्यात कंपनी 'एक्स-डिव्हिडंड' व्यवहार करत होती, तेव्हा कंपनीनं एका शेअरवर ७० रुपयांचा लाभांश दिला होता. त्यापूर्वी जून महिन्यातही कंपनीनं एका शेअरवर ६९ रुपयांचा लाभांश जाहीर केला होता.
