Blinkit Zepto : क्विक कॉमर्स कंपन्यांचा उदय झाल्यापासून लोक दुकानात जायचं नाव घेत नाही. ब्लिंकिट, झेप्टो सारख्या कंपन्यांमुळे याचा झपाट्याने विस्तार होत आहे. या अॅप्सद्वारे लोक छोट्या-मोठ्या गोष्टी ऑर्डर करतात. एकीकडे त्यामुळे लोकांचे जीवन सुसह्य होत आहे. दुसरीकडे छोटे व्यापारी त्याला बळी पडत आहेत. याचा विचार करुन FMCG कंपन्यांनी मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे छोटे दुकानदार आणि व्यापाऱ्यांना मोठा फायदा होणार आहे.
वास्तविक, हिंदुस्तान युनिलिव्हर, ITC, पार्ले उत्पादने आणि अदानी विल्मर इत्यादी FMCG कंपन्या क्विक कॉमर्सवर त्यांच्या लहान पॅकेजिंग उत्पादनांची विक्री थांबवणार आहेत. या निर्णयामागील सर्वात मोठे कारण म्हणजे छोट्या दुकानदारांना वाचवणे आहे. या कंपन्या आता क्विक कॉमर्ससाठी वेगवेगळ्या किमतीत पॅक लॉन्च करणार आहे. त्यासाठी काम सुरू करण्यात आले आहे.
स्वतंत्र पॅकेजिंगची तयारी
पार्लेने क्विक कॉमर्ससाठी पार्ले जी, हाइड अँड सीक, क्रॅक जॅक आणि मोनॅको सारख्या मोठ्या ब्रँडचे वेगवेगळे पॅक लॉन्च केले आहेत. त्याची किंमत ५०-१०० रुपये आहे. तर ३० रुपयांपर्यंतचे छोटे बिस्किट पॅक फक्त किराणा दुकानात उपलब्ध असतील. लोक रिलायन्स आणि डी मार्ट कडून एक महिन्यासाठी किंवा मोठ्या प्रमाणात वस्तू खरेदी करतात. म्हणून येथे १२०-१५० रुपये किंमतीचे पॅक विकले जातील.
क्विक कॉमर्समधून खरेदी करणे महाग
आयटीसीने एंगेज परफ्यूम, सॅव्हलॉन हँड वॉश आणि मंगलदीप अगरबत्ती यासह अनेक मोठ्या ब्रँडसाठी वेगवेगळे क्विक कॉमर्स पॅक लॉन्च केले आहेत. देशातील सर्वात मोठी पॅकेज्ड फूड ऑइल कंपनी, अदानी विल्मार, स्वयंपाकासाठी लागणारे तेल आणि डाळींसारख्या स्टेपल्स या दोन्हींसाठी क्विक कॉमर्ससाठी स्वतंत्र ब्रँड सुरू करणार आहे. त्याचबरोबर हिंदुस्थान युनिलिव्हरनेही वेगवेगळे पॅकेज तयार करण्यास सुरुवात केली आहे.
अदानी विल्मरचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंगशु मलिक यांनी सांगितले की, क्विक आणि उर्वरित ई-कॉमर्ससाठी वेगळ्या ब्रँडची योजना आखली जात आहे. किराणा दुकानात विकल्या जाणाऱ्या पॅकपेक्षा त्याची किंमत थोडी जास्त असेल असे ते म्हणाले. कारण क्विक कॉमर्समधून खरेदी करणारे ग्राहक चांगल्या स्थितीत आहेत.