Sensex Nifty Hike: २०२५ मध्ये शेअर बाजाराने फारशी समाधानकारक कामगिरी केलेली नाही. जानेवारी २०२५ पासून आतापर्यंत निफ्टीनं ९.२५% वाढ दर्शवली आहे, जी २०२४ च्या परताव्यापेक्षा सुमारे ५ टक्क्यांनी कमी आहे. त्याचप्रमाणे सेन्सेक्समधील वाढही गेल्या वर्षीच्या तुलनेत २% कमी राहिली आहे. अमेरिकेनं भारतावर लादलेला २५% अतिरिक्त टॅरिफ आणि रुपयाची घसरण यांसारख्या कारणांमुळे परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांचा (FII) भारतीय बाजारावरील विश्वास कमी झाला.
यामुळे यावर्षी परदेशी गुंतवणूकदारांनी विक्रमी विक्री केली. मात्र, देशांर्तगत संस्थागत गुंतवणूकदारांनी (DII) ही विक्री पेलून धरली. जीडीपी वाढ, जीएसटीमधील सवलती आणि व्याजदरात कपात यांसारख्या मोठ्या निर्णयांनी बाजाराला आधार दिला आणि नवीन विक्रम प्रस्थापित झाले. तरीही, गुंतवणूकदारांच्या अपेक्षेपेक्षा बाजाराची वाढ कमीच राहिली. आता ब्रोकरेज हाऊसेसच्या मते, आगामी वर्ष २०२६ मध्ये निफ्टी आणि सेन्सेक्समध्ये मोठी तेजी पाहायला मिळू शकते.
नव्या सीरिजची दमदार सुरुवात; Sensex २०० अंकांनी वधारला, मेटल शेअर्समध्ये मोठी तेजी
मॉर्गन स्टेनली आणि नोमुराचा सकारात्मक अंदाज
जागतिक ब्रोकरेज फर्म मॉर्गन स्टेनलीच्या अंदाजानुसार, भारतीय बाजार २०२६ मध्ये मोठी झेप घेऊ शकतो. डिसेंबर २०२६ च्या अखेरीस सेन्सेक्स १,०७,००० अंकांच्या पातळीपर्यंत जाऊ शकतो, असं त्यांचं मत आहे. सेन्सेक्सचा सध्याचा भाव ८४,६७५.०८ अंक असून हा अंदाज २६% वाढ दर्शवतो. मात्र, जर २०२६ मध्ये सकारात्मक संकेत मिळाले नाहीत, तर सेन्सेक्स १०% घसरून ७६,००० च्या पातळीवरही येऊ शकतो, असा सावधगिरीचा इशाराही त्यांनी दिला आहे.
दुसरीकडे, नोमुरा या फर्मचं म्हणणं आहे की, २०२६ मध्ये बाजारात अनेक सकारात्मक घडामोडी घडतील, ज्यामुळे निफ्टी २९,३०० च्या पातळीपर्यंत पोहोचण्यास मदत होईल.
गोल्डमैन सॅक्स आणि कोटक सिक्युरिटीजन काय म्हटलं?
गोल्डमॅन सॅक्सनं गेल्या महिन्यात भारतीय स्टॉक्सना 'ओवरवेट' झोनमध्ये ठेवले होते. त्यांच्या मते, बाजाराची या वर्षाची कामगिरी आतापर्यंतची सर्वात खराब ठरली असली तरी, येणाऱ्या वर्षात तेजीची पूर्ण शक्यता आहे. २०२६ च्या अखेरीस निफ्टी ५० निर्देशांक १२ टक्क्यांनी वाढून २९,००० पर्यंत जाण्याचा त्यांचा अंदाज आहे. कोटक सिक्युरिटीजच्या मते, हे वर्ष बाजार 'कन्सोलिडेशन झोन'मध्ये राहिला आहे. मात्र २०२६ मध्ये मोठी वाढ अपेक्षित असून त्यांनी निफ्टीसाठी ३२,०३२ चं टार्गेट ठेवलंय. हे सध्याच्या पातळीपासून २३.५% वाढ दर्शवते.
ॲक्सिस सिक्युरिटीजचा मध्यम वाढीचा अंदाज
ॲक्सिस सिक्युरिटीजनं निफ्टीच्या वाढीबाबत मध्यम स्वरूपाचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यांच्या मते, २०२६ च्या अखेरीस निफ्टी ८ टक्क्यांच्या वाढीसह २८,१०० च्या पातळीपर्यंत पोहोचू शकतो. विविध ब्रोकरेज हाऊसेसचे हे अंदाज पाहता, गुंतवणूकदारांसाठी २०२६ हे वर्ष २०२५ च्या तुलनेत अधिक फायदेशीर ठरण्याची चिन्हं दिसत आहेत.
