नवी दिल्ली: केंद्र सरकारच्या नवीन कामगार संहितेमुळे नोकरदार वर्गाच्या 'टेक-होम सॅलरी'मध्ये तात्पुरती कपात होणार असली तरी, निवृत्तीच्या वेळी मिळणाऱ्या निधीत मात्र भरमसाठ वाढ होणार आहे. नवीन नियमांमुळे पीएफ आणि एनपीएसमध्ये जास्त योगदान जमा करणे बंधनकारक झाल्याने, कर्मचाऱ्यांच्या वृद्धापकाळासाठी कोट्यवधींचा अतिरिक्त निधी तयार होणार आहे.
नवीन कामगार नियमांनुसार, कंपनीला कर्मचाऱ्याची 'बेसिक सॅलरी' ही त्यांच्या एकूण 'सीटीसी'च्या किमान ५० टक्के ठेवणे अनिवार्य झाले आहे. या नियमामुळे, ज्या कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन पूर्वी कमी होते आणि भत्ते जास्त होते, त्यांना फरक जाणवेल. उदाहरणार्थ, ज्या कर्मचाऱ्याचे मासिक सीटीसी १,००,००० रुपये आहे आणि त्यांचे मूळ वेतन ३०,००० रुपये होते, ते आता ५०,००० रुपये होणार आहे.
बेसिक सॅलरी वाढल्यामुळे, पीएफ आणि एनपीएसमध्ये जाणारे योगदान वाढणार आहे. यामुळे या पगाराच्या कर्मचाऱ्याच्या हातात दर महिन्याला येणारा पगार अंदाजे ७,६०० रुपयांनी कमी होणार आहे.
निवृत्तीसाठी २.३१ कोटींचा बंपर फायदा
सुरुवातीला पगार कमी झाल्यामुळे गैरसोय वाटू शकते, पण दीर्घकाळात हे मोठे वरदान ठरणार आहे. ३५ वर्षांच्या सेवा कालावधीचा विचार केल्यास, १ लाख रुपये मासिक सीटीसी असलेल्या कर्मचाऱ्याचा निवृत्ती निधी जुन्या नियमांनुसार ३.४६ कोटी रुपये होत होता. मात्र, नवीन कामगार संहितेमुळे पीएफ आणि एनपीएसचे योगदान वाढल्याने, निवृत्तीच्या वेळी जमा होणारा एकूण निधी तब्बल ५.७७ कोटी रुपयांपर्यंत जाणार आहे. याचा अर्थ, कर्मचाऱ्याला २.३१ कोटी रुपये इतका अतिरिक्त निधी मिळेल.
